Loksabha 2019 : गुजरातच्या प्रचारसभांमध्ये विदर्भाची ‘जादू’!

नितीन नायगांवकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

नागपूर -  गुजरातमधील लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोड्यांसोबत विदर्भातील जादूगारही चांगलेच चर्चेत आहेत. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि प्रचाराशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांची गर्दी वाढविण्यासाठी विदर्भातील ५० जादूगार सक्रिय असून, ही ‘जादू’ २१ एप्रिलपर्यंत वातावरणनिर्मिती करणार आहे.

नागपूर -  गुजरातमधील लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोड्यांसोबत विदर्भातील जादूगारही चांगलेच चर्चेत आहेत. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि प्रचाराशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांची गर्दी वाढविण्यासाठी विदर्भातील ५० जादूगार सक्रिय असून, ही ‘जादू’ २१ एप्रिलपर्यंत वातावरणनिर्मिती करणार आहे.

पूर्वी निवडणुकीच्या निमित्ताने रंगणारा राजकीय फड कलावंतांच्या सहभागाशिवाय पूर्ण होत नसे. आज राजकीय सभांना लाखोंनी होणारी गर्दी दुर्मीळ झाल्याने कलावंतांना आमंत्रित करण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. नागपुरातील पंधरा दिवसांच्या प्रचार सभा आणि रॅलींमध्ये अगदीच मोजक्‍या ठिकाणी कलावंत झळकले. पथनाट्य, एकपात्री, संगीत या माध्यमातून लोकांना  आकर्षित करणे आणि गर्दी झाली की सभेला सुरुवात करणे, अशी ही पद्धत आहे. गेल्या  लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरातमधील लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील तीनशे जादूगारांना आमंत्रित केले होते. यंदाच्या निवडणुकीतही भाजपनेच पुढाकार घेतला असला तरीही इतर पक्षही या जादूगारांच्या माध्यमातून नशीब आजमावून बघत आहेत. गुजरातमधील राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या इव्हेंट कंपनीने मध्यस्थी करून विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील जवळपास ५० जादूगार आमंत्रित केले. यात नागपुरातील संख्या अधिक आहे. गेल्या वीस वर्षांपासून जादूचे प्रयोग करणारे प्रसिद्ध जादूगार प्रशांत भावसार यांचाही यामध्ये समावेश आहे. ‘सभा किंवा रॅलीच्या पूर्वी अर्धा ते एक तास आमचे प्रयोग होतात आणि लोक जमले की  भाषणांना सुरुवात होते. गर्दी जमविण्यासाठी जादूगार आमंत्रित केले जातात आणि आम्ही अत्यंत आनंदाने हे काम करतो,’ असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. काही जादूगार गुजरातमध्ये दाखल झाले असून, काही उद्यापर्यंत (सोमवार) पोहोचणार आहेत. बडोदा, अहमदाबाद, गांधीनगर, सुरत यासह जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये जादूचे प्रयोग होत आहेत. आता ही ‘जादू’ प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कुणाला फायदा करून देते, याची उत्सुकता असणार आहे.

जादूगारांचे महत्त्व कायम आहे, याचाच आम्हाला अधिक आनंद आहे. आम्ही कला सादर करतो आणि त्याचे मानधन घेतो, हा व्यवहार झाला. पण, जादूचे प्रयोग बघण्यासाठी लोक गर्दी करतात, हा कलेचा सन्मान आहे. निमित्त कुठलेही असो.

- प्रशांत भावसार, प्रसिद्ध जादूगार

Web Title: Vidarbha magicians in Gujarat Lok Sabha elections