Loksabha 2019 : तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

येथे मतदान 
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. 

मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया सुळे, डॉ. सुजय विखे, नीलेश राणे, रक्षा खडसे आणि धैर्यशील माने या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे. 

आज शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. या तिसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा आणि कोकणातील प्रत्येकी दोन, उत्तर महाराष्ट्रातील तीन, तर पश्‍चिम महाराष्ट्रतील सात अशा एकूण 14 लोकसभा मतदारसंघांत येत्या मंगळवारी मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये विविध राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या बहुरंगी लढतींकडे लागले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे बारामतीमधून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रयत्नात आहेत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले चिरंजीव डॉ. सुजय यांच्यासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. सुजय विखे हे नगरमधून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवित आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात चिरंजीव नीलेशसाठी ठाण मांडून बसले आहेत. तळ कोकणातील वर्चस्व टिकविण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. भाजपमध्ये उपेक्षा सहन करणारे उत्तर महाराष्ट्रातील नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या रावेरमधून निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेत आव्हान दिले आहे. त्यामुळे येथील लढती लक्षवेधी बनल्या आहेत. जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात कॉंग्रेसचे विलास औताडे निवडणूक लढवित आहेत, येथे दानवेंचा विजय निश्‍चित मानला जात असला तरीसुद्धा, यंदा त्यांना प्रस्थापितविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. 

दिग्गजांच्या सभा 
तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजमध्ये सभा घेतली आहे. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदींनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सातारा, पुणे, रायगड मतदारसंघांत सभा घेऊन निवडणुकीत रंग भरला आहे. 

येथे मतदान 
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. 

Web Title: Voting tomorrow for the third phase