esakal | Loksabha 2019 : अकलूजमध्ये शेतकऱ्यांकडून मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha 2019 : अकलूजमध्ये शेतकऱ्यांकडून मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे.

Loksabha 2019 : अकलूजमध्ये शेतकऱ्यांकडून मोदींना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

sakal_logo
By
मनोज गायकवाड

अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी यांची येथे सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. भाजपचे माढा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बारामती मतदार संघातील उमेदवार रंजना कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, बारामती मतदारसंघाच्या उमेदवार रंजना कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाची किनार या सभेला आहे, त्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांची मोठी गर्दी या सभेला अपेक्षित आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी हिताच्या कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. असा आरोप करीत बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सभेला येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे.

माढा मतदार संघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही मात्र ते या सभेच्या मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खासदार मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या मंचावर त्यांचा सन्मान केला जाणार आहे अशी माहिती मिळाली आहे. खासदार मोहिते-पाटील यांचा होणारा सन्मान भाजपला राजकीय फायदा मिळवून देणारा ठरु शकतो.

loading image
go to top