Loksabha 2019 : मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवेल्या बॉक्समध्ये नक्की होतं तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

हा बॉक्स सेक्युरिटी प्रोटोकॉलचा भाग का नव्हता? इनोव्हा हे वाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ताफ्याचा भाग का नव्हते? हे वाहन कोणाचे होते?

चित्रदुर्गा : यूथ काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख श्रीवत्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल करून भाजप सरकारला धारवेर धरण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक मधील चित्रदुर्गा येथे नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरचे लँण्डिंग झाल्यानंतर हेलिकॉप्टर मधून एक काळा बॉक्स एका चारचाकी वाहनात नेऊन ठेवण्यात आला. या बॉक्स मध्ये नक्की काय होतं आणि ती गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगाने करावा अशा स्वरुपाचे ट्विट त्यांनी केले आहे. श्रीवस्त यांच्या दाव्यानुसार चित्रदुर्गा येथे मोदींचे हेलिकॉप्टर लँण्ड झाल्यानंतर हा व्हिडीओ काढण्यात आला.

व्हिडीओ शेअर करताना श्रीवत्स यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. हा बॉक्स सेक्युरिटी प्रोटोकॉलचा भाग का नव्हता? इनोव्हा हे वाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ताफ्याचा भाग का नव्हते? हे वाहन कोणाचे होते?

यासोबतच द टेलिग्राफ ने सुद्धा याविषयी वृत्त दिले असून, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुडू राव यांनीदेखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी 'चित्रदुर्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक रहस्यमयी बॉक्स उतरवण्यात आला आणि एका खासगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला. ती कार लगेच तिथून निघून गेली. या बॉक्समध्ये काय होतं आणि ही गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगाने केला पाहिजे.' अशी मागणीही गुडू राव यांनी केली आहे. 

Web Title: What was in the box which dropped from Modis helicopter