Loksabha 2019 : शिवसेनेचा चौकार राष्ट्रवादी रोखणार?

उत्तम कुटे
शनिवार, 16 मार्च 2019

राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

पिंपरी : चौकार मारण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ खासदार विरुद्ध पहिलीच निवडणूक लढणारे नवखे सेलिब्रिटी अशी थेट लढत यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

ही लढत शिवसेनेचे पूर्वीचे उपनेते आणि विद्यमान खासदार अशी होत आहे. गुळगुळीत पाटी विरुध्द कोरी पाटी अशी ती आहे. तरी ती गतवेळसारखी एकतर्फी न होता चुरशीची होणार आहे. डॉ. कोल्हे यांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश एक मार्चला  झाला. त्याचदिवशी तेच उमेदवार असतील. हे नक्की झाले होते. फक्त 15 मार्चला ते जाहीर झाले. तीन टर्म खासदार असलेल्या आढळरावांविरुद्ध डॉ. कोल्हे यांच्यासारख्याच उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी होती. म्हणून तेथील उमेदवारीचं ठरत नव्हतं.

शिरुरच नाही तर पुणे जिल्ह्यात माळी मतदार अधिक आहे. त्यांचे काहीअंशी वर्चस्व आहे. ही बाब डॉ. कोल्हे यांना तिकीट देताना राष्ट्रवादीने विचारात घेतलेली असणार हे नक्की. धर्मरक्षक संभाजी मालिकेमुळे ते अगोदरच घराघरात पोचल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. कोरी पाटी असल्याने डॉ. कोल्हेंवर टीका करणे आढळरावांना अवघड जाणार आहे.  त्यामुळे त्यांनी व्यूहरचना बदलली असून, जातीचे बाण सोडणे सुरु आहे. त्यांंना आपले मराठा कार्ड बाहेर काढावे लागले आहे. 

दुुसरीकडे आढळरावांचा वेध घेण्यासाठी मतदारसंघाबाहेर गेलेला विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे आणि हायवे, रेड झोन असा दारुगोळा राष्ट्रवादीकडे आहे. त्यात भलेमोठे लीड  देणाऱ्या भोसरी विधानसभा मतदारसंघात ते यावेळी युतीला न मिळेल, अशी परिस्थिती आहे.

मोदी लाटही आता राहिलेली नाही. फक्त तीन टर्मचे मोठे भांडवल आहे. परिणामी आढळरावांचा मोठा जनसंपर्क आहे. पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून होत असलेले मतदान ही बाब त्यांना दरवेळी सहाय्यभूत ठरत आहे. युतीच्या पाच आमदारांची फौज त्यांच्याकडे आहे. एकूूूणच आढळरावांचा वैयक्तिक करिष्माविरुद्ध राष्ट्रवादीची पणास लागलेली प्रतिष्ठा असा हा सामना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will win in Loksabha Shivajirao Adhalarao Patil or Amol Kolhe