Loksabha 2019 : भाजपचे महाराष्ट्रात मिशन 'बारामती' का? 

संभाजी पाटील 
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील पहिल्या सभेतच शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून महाराष्ट्रातील प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील पहिल्या सभेतच शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून महाराष्ट्रातील प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट केले.

राज्यातील काँग्रेसच्या बहुसंख्य मोठ्या घराण्यांना आपल्याकडे ओढून काँग्रेस खिळखिळी करण्यात भाजपला यापूर्वीच यश आले आहे. निवडणुकीपूर्वी डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेच्या थेट जबड्यात हात घालून त्याला शांत करण्यात आले. "मनसे'ला लोकसभा निवडणूकच लढवावी वाटली नाही, "आप' ने राज्यातून काढता पाय घेतला. अशा वेळी भाजपचे राज्यातील लक्ष्य अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच राहणार हे स्पष्ट आहे. या लक्ष्याचा अचूक भेद करण्यासाठी थेट मूळावरच अर्थात "बारामती'वर घाव घालण्याची व्यूहरचना भाजपने केली आहे. त्यासाठी भाजप "साम-दाम-दंड-भेद' या साऱ्या नितींचा वापर करणार हे नक्की. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस याला कसे सामोरे जाणार याबद्दल उत्सुकता आहे. 

"बारामती'चा पराभव करू ही घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसला तशी नवी नाही. पण "फोडा आणि पक्ष वाढवा' या धोरणाचा अवलंब भाजपने गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर केला. भाजपच्या विजयाचा वारू मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटकात रोखला गेल्याने या नितीचा अधिक प्रभावी वापर करण्याचा निर्धार भाजपने केलेला दिसतो.  लोकसभा निवडणुकीत आधी मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेचा विरोध शांत केला. त्यासाठी नाणार प्रकल्प रद्द करणे, राज्यात सत्तेत पन्नास टक्के वाटा, लोकसभा निवडणुकीत पालघरची एक जास्तीची जागा असा तह करण्यात आला. दुसरीकडे कॉंग्रेसच्या "निष्ठावंत' घराण्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप यशस्वी झाला.  नगरमध्ये विखे-पाटील, अकलूजचे मोहिते-पाटील, फलटणमध्ये नाईक-निंबाळकर आदींना आयात करण्यात आले. यात काहींना उमेदवारी दिली गेली, काहींना त्यांच्या सहकारी संस्था जगविण्याचे आश्वासन देण्यात आले. काहींना विधान परिषद तर काहींना राज्यसभा देण्याचे आमिष दाखवले. थोडक्‍यात कॉंग्रेसला अपेक्षित धक्के देण्यात भाजपला यश आले. 

आता उरली ती राष्ट्रवादी कॉंग्रेस. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान नकोत, यासाठी देशभर विरोधकांची मोट बांधली. ममता, चंद्राबाबू नायडू यांच्यासह विविध घटक पक्षांना एकत्र आणले. अगदी महाराष्ट्रात "मनसे'ला मोदींच्या विरोधात उतरविण्यातही ते यशस्वी झाले. जर महाराष्ट्रात पवार यांना रोखले नाही तर प्रादेशिक पक्षांचे मोदी विरोधी लोण देशभरात पसरेल ते आवरणे कठीण जाईल, हा धोका भाजपला वाटतो. त्यामुळे काही करून पवार यांना महाराष्ट्रातच रोखावे त्यातही पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावावा, यासाठी भाजप गेली वर्ष-दीड वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. डबघाईला आलेल्या सहकाराचा आधार घेत थकीत एफआरपी असणारे साखर कारखाने, दूध संघ, बॅंका-पतसंस्था यामधील गैरव्यवहार शोधून या जनतेला नाडलेल्या व स्वत: नडलेल्या राजकीय नेत्यांना कधी कारवाईची धमकी दिली, कधी मदतीचा हात दिला आणि आपल्याकडे वळविले. यात दोन्ही कॉंग्रेसच्या त्या-त्या भागातील वजनदार नेत्यांचा समावेश आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, माढा, सोलापूर मतदारसंघात हा प्रयोग यशस्वी झाला. पण पवार यांना रोखण्यासाठी "बारामती' मतदारसंघात सर्व ताकद लावण्याचा भाजपचा निर्णय राष्ट्रवादीला मुळातून धक्का देणे हाच आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, गिरीश बापट, विजय शिवतारे ही फौज बारामतीमध्ये कामाला लावली आहे. यंदा प्रथमच उमेदवार देताना एक "सिरियस' उमेदवार आम्ही दिला, असा संदेशही त्यांनी कांचन राहुल कुल यांच्या उमेदवारीने दिला. कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना थेट मंत्री करण्याची "ऑफर'ही देण्यात आली. आता या सर्व प्रयत्नांना किती यश येईल, हे 23 मे ला मतमोजणी झाल्यावर समजेल. पण "पवार कुटुंबियांमध्येच भांडणे आहेत', "अजित पवार नाराज आहेत'. "मुलाला विजयी करण्यासाठी ते काहीही करू शकतात,' अशा चर्चा पसरविल्या जात आहेत. या सर्वांमागे शरद पवार यांना राजकीय लक्ष्य करणे हा खरा हेतू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. एकदा हे मूळ उखडले की, इतर पक्षांना संपविणे भाजपला सहज शक्‍य होणार आहे. त्यास शिवसेनाही अपवाद असणार नाही. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे.

भाजपची ही व्यूहनिती राष्ट्रवादीला परिचित नाही असे नाही, पण सत्ता गेल्याने हतबल झालेल्या राष्ट्रवादीला स्वत:ला सावरण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार हे मात्र नक्की! 

Web Title: Why BJP wants to win Baramati article written by Sambhaji Patil