Loksabha 2019 : लोक मोदींचा इतका राग-द्वेष का करतात?

मंदार कुलकर्णी
बुधवार, 10 एप्रिल 2019

मोदी यांच्या वृत्ती हुकूमशहासारखी आहे, ते मनमानी पद्धतीनं वागतात. मुद्दा रास्त आहे. पण हा मुद्दा थोडा आधीच्या सरकारांच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तपासून बघितला पाहिजे. मनमोहनसिंग यांच्या काळात धोरणांच्या पातळीवर गोंधळ होता, निर्णय लवकर घेतले जात नव्हते, हे जगजाहीर आहे. शिवाय हे इतर कुणी नाही, तर तत्कालीन रिझर्व्ह बँकांच्या पतधोरणांत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काहीही मत व्यक्त केलं, किंबहुना त्यातल्या सकारात्मक हेतूचा किंचित जरी `वास` आला, तरी लगेच प्रतिवाद करणारे, मूळ मुद्दा बाजूला ठेवून विषय भरकटवून टाकणारे अनेक लोक तुम्हाला सोशल नेटवर्किंगवर भेटले असतील, भेटत असतील, पुढं भेटतील. असे लोक केवळ काही कुहेतूनं मोदी यांचा राग, द्वेष करत असतील असं कुणीच समजायचं कारण नाही. किंबहुना अनेकांच्या या रागामध्ये एक कळकळही आपल्याला दिसते. पण ज्या गोष्टींसाठी असे काही लोक मोदी यांचा इतका राग, द्वेष करतात नेमक्या त्याच गोष्टींसाठी मोदी यांच्या बाजूनं उभा राहणारा, त्यांचा `भक्त` होणारा खूप मोठा वर्ग आहे हे कुणी लक्षात का घेत नाही? या दोन्ही बाजू बरोबर की चूक हा भाग आपण किंचित बाजूला ठेवू, पण संपूर्ण मतप्रवाह `मोदी यांच्या बाजूनं` आणि `मोदी यांच्या विरुद्ध` असा का झाला आहे हे जाणून घेणं तार्किक ठरेल.

थोडंसं मुद्द्यांनुसार जाणून घेऊ. अगदी पहिला मुद्दा- मोदी यांच्या वृत्ती हुकूमशहासारखी आहे, ते मनमानी पद्धतीनं वागतात. मुद्दा रास्त आहे. पण हा मुद्दा थोडा आधीच्या सरकारांच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर तपासून बघितला पाहिजे. मनमोहनसिंग यांच्या काळात धोरणांच्या पातळीवर गोंधळ होता, निर्णय लवकर घेतले जात नव्हते, हे जगजाहीर आहे. शिवाय हे इतर कुणी नाही, तर तत्कालीन रिझर्व्ह बँकांच्या पतधोरणांत म्हटलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अनेक पतधोरण अहवाल असे दाखवता येतील, ज्यांमध्ये धोरणांच्या पातळीवर गोंधळ आहे असं सूचित केलं आहे. यूपीए-१ चांगलं होतं-कारण डाव्यांचा एक अंकुश होता, यात काही वाद नाही- मात्र यूपीए-२मध्ये मित्र पक्षांनी जो काही धुमाकूळ घातला होता, तो सगळा केवळ बघण्याशिवाय मनमोहनसिंग यांच्या हातात दुसरं काही नव्हतं.

 narendra modi

अजितसिंह वगैरेंनी विमानवाहतूक मंत्रालय, डी. राजा वगैरेंनी दूरसंचार मंत्रालय ज्या पद्धतीनं हाताळलं ते सगळ्या देशानं बघितलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर (चुकीचे का असेना, पण) ठाम निर्णय घेणारा पंतप्रधान लोकांना आवडतो आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. नोटाबंदीसारखा निर्णय घेणं हे सोम्यागोम्याचं काम नाही हे कुणाच्या लक्षात का येत नाही? इथं ठाम वृत्ती लागते. आपण नोटाबंदीच्या मेरिट्सचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवू-पण असा निर्णय कुणी तरी घेत आहे हे कुणाला तरी भावतंही आहे. इथं `गुडी गुडी` वृत्तीचा, लेचापेचा माणूस निर्णय घेऊ शकणारच नाही. त्यामुळं एका वर्गाला असा निर्णय घेणारी व्यक्ती हुकूमशहा वाटते आहे, त्याच वेळी खूप मोठ्या वर्गाला त्यात ठामपणा दिसतो आहे आणि त्यांना तो ठामपणा हवाही आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे. 

मोदी अतिशय निष्ठूर आहेत, असा एक आक्षेप आहे. आहेतच. पण त्यातून होणा-या लाभांकडेही बघणारा एक वर्ग आहे. साधं उदाहरण घ्या. पंचाहत्तर वर्षांपुढच्या नेत्यांना उमेदवारी द्यायची नाही हा केवढा मोठा निर्णय आहे. कोणत्या पक्षानं असं धाडस दाखवलं आहे? व्हीलचेअरवर येणारे करुणानिधी, जर्जर झालेले सीताराम केसरी आणि इतर किती तरी नेते आपण बघितले आहेत. वयामुळं राजकारणातून निवृत्ती घेणारे किती लोक आहेत? या पार्श्वभूमीवर असा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला, त्याची अंमलबजावणी केली, यात काहीच पॉझिटिव्ह नाही? लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा हे आदरणीय आहेत, यात वादच नाही. त्यांना बाजूला करण्यामुळं अनेक जण दुखावले आहेत हेही खरं आहे. पण एक अतिशय अवघड असा निर्णय घेतल्याचं धाडस मोदी यांनी दाखवलं आहे आणि पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा करून दिला आहे हेही तुम्हाला दिसत नाही का?

narendra modi

ज्येष्ठ नेते बाजूला होत नाहीत म्हणून त्यांच्याच पुढच्या पिढीतले लोक किती आकांडतांडव करतात हे मुलायमसिंह यादव-अखिलेश यादव यांच्या एकाच उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं मोदी यांनी स्वतः सगळा वाईटपणा घेऊन एक अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे, हेही महत्त्वाचं नाही का? म्हणजे एका वर्गाला मोदी निष्ठूर दिसत आहेत, त्याच वेळी या निर्णयांमागची ही पॉझिटिव्ह बाजूही आहेच. हा किंवा अशा प्रकारचे निर्णय घ्यायला निष्ठूरपणाच लागतो. नाही तर विचार करा, हसतखेळत गप्पा मारल्या असत्या, तर ही ज्येष्ठ मंडळी बाजूला झाली असती का? त्याच्याही पुढचं सांगतो- या नेत्यांना बाजूला सारण्याचा निष्ठूरपणा जसा मोदी यांनी दाखवला, तितकाच निष्ठूरपणा ते स्वतःच्याही बाबतींत शंभर टक्के दाखवतील, यात काही वादच नाही. हे वाक्य लिहून ठेवा. 

मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत असाही एक आरोप केला जातो. तो मलाही मान्य आहे. पण या ठिकाणी एक माध्यमकर्मी म्हणून माझं वेगळं मत आहे. पत्रकार परिषद आणि सामूहिक वार्तालाप यात फरक आहे. पत्रकार परिषदेत काही घोषणा केल्या जातात, माहिती दिली जाते आणि सामूहिक वार्तालापांत पत्रकार त्या नेत्याशी चर्चा करतात. सध्याच्या सोशल मेडियाच्या जगात पत्रकार परिषदांचं महत्त्व खूपच कमी झालं आहे, हे वेगळं सांगायला नको. राहता राहिला मुद्दा वार्तालापाचा.

सामूहिक वार्तालापांमध्ये अनेकदा मुद्दे भरकटत जातात. एका ज्येष्ठ पत्रकारानं सेन्सिबल प्रश्न विचारला, की पुढचा प्रश्न अगदी पोरकटपणे विचारला जातो आणि त्या वार्तालापाचं गांभीर्य नष्ट होतं असं अनेकदा होतं. मनमोहनसिंग यांनी तत्कालीन पंतप्रधानपदाच्या शेवटच्या काळात घेतलेला एक सामूहिक वार्तालाप मला आठवतो. त्यात एका ज्येष्ठ पत्रकारानं गंभीर प्रश्न विचारल्यावर पुढचा प्रश्न `मनमोहनसिंग तुम्ही कुठले चित्रपट बघता` असा आला आणि त्या वेळी मनमोहनसिंग यांचा चेहरा पडला होता. मोदी यांच्यासारख्या मुरब्बी माणसाला हे लक्षात येत नसेल? शिवाय ते अडचणीत येणार किंवा मूळ मुद्दा भरकटणार हे आधीच दिसत असेल तर ते धोका कशाला पत्करतील? मोदी वन-टू-वन मुलाखती देत आहेत. तिथं थोडं प्रश्नांमध्ये संगती लागते, सातत्य असतं हेही लक्षात घ्या. त्यामुळं ते माध्यम त्यांना पसंत पडत असेल. त्यामुळं मोदी पत्रकार परिषदांपासून पळ काढत आहेत, असा एका वर्गाचा आरोप आहे, त्याच वेळी त्यामुळं साध्य काय होणार आहे असा विचार करणाराही एक वर्ग आहेच. पत्रकारांमधली निष्पक्षता (अगदी माझ्यापासून) तपासणंही इथं आवश्यक ठरतं, बरोबर की नाही?

narendra modi

मोदींनी घटनात्मक संस्थांमध्ये हस्तक्षेप केले, असा एक आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयामधल्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी तत्कालीन सरन्यायाधीशांविरुद्ध बंड केलं. त्यानंतर त्यातलेच एक न्यायमूर्ती सध्या सरन्यायाधीश आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. केंद्रीय अन्वेषण विभागातल्या क्रमांक एकच्या अधिका-यानं क्रमांक दोनच्या अधिका-याविरुद्ध (तो मोदी यांच्या जवळचा आहे हेही आपण धरून चालू इथं) कार्यवाही केली. प्रकरण प्रचंड पेटलं. अशा वेळी त्या दोन्हीही अधिका-यांपैकी कुणालाही पदावर ठेवणं चुकीचं ठरलं असतं. त्यामुळं त्या दोघांनाही बाजूला करण्याशिवाय दुसरा काय पर्याय होता? टू बी फ्रँक, दिल्लीतल्या बाबूशाहीची एक विशिष्ट अशी कार्यपद्धत आहे. कॉंग्रेसमधल्या कार्यपद्धतीशी ती मिळतीजुळती आहे.

`सगळे मिळून खाऊ या` अशी ती पद्धत आहे. या पद्धतीला छेद देणं आवश्यक नाही का? शिवाय दिल्लीतल्या संस्कृतीच्या बाहेरचा एक माणूस पंतप्रधान झाला, की अचानक सगळ्या संस्था ताब्यात कशा घेऊ शकेल बरं? शिवाय हे जर खरं असेल, तर मग इतक्या वर्षांतल्या तत्कालीन प्रमुखांनी काय काय केलं असेल? मुद्दा मला वाटतं कार्यपद्धतीचा आहे. बाबुशाहीला मोदी यांनी काही प्रमाणात छेद दिला, हेही मान्य करावंच लागेल. त्यात वैयक्तिक स्वार्थ असता तर तो आजपर्यंत दिसला असता. (लोक कार्यकारणभावही बघत असतातच) त्यामुळं हा कथित हस्तक्षेप काहींना खलनायकी वाटतो आहे, त्याच वेळी काहींना त्यात काही पॉझिटिव्ह गोष्टीही दिसत आहेत, हेही महत्त्वाचं आहे. 

मोदी हे माणूसघाणे आहेत, माणसांत मिसळत नाहीत असाही एक आरोप केला जातो. त्यात बरंच तथ्यही आहे. पण काही वेळा तुम्ही अमुक व्यक्तीच्या खूप जवळचे होता, तेव्हा त्या व्यक्तीला झुकतं मापही देण्याची शक्यता असते. त्यामुळं मोदी ठरवूनच यापासून अलिप्त राहत असतील तर? सतत पक्षश्रेष्ठींशी चापलुसी करणे ही इतर पक्षांची संस्कृती आहे, हे काही वेगळं सांगायला नको. पण नेमकं त्या चापलुसीलाच मोदी यांना छेद द्यायचा असेल तर? महाराष्ट्रातले तत्कालीन मुख्यमंत्री किती `स्वतंत्रपणे` काम करू शकत होते आणि देवेंद्र फडणवीस कसे काम करू शकतात, हा फरक तुम्हाला दिसत नाही का? मोदी समजा फडणवीस यांच्यापासून फटकून राहत असतील, त्यांना जवळ येण्याची संधी देत नसतील, पण ते त्यांना भरपूर स्वातंत्र्यही देत आहेत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेच समजा ते फडणवीस यांच्याशी कायम संपर्कात असते, तर मग फडणवीस यांनाही स्वतंत्रपणे काम करता येणार नाही, असाही विचार नसेल का?

खरं तर असे अनेक मुद्द्यांचा प्रतिवाद करता येईल. इथं मोदी यांचं समर्थन करण्याचा उद्देश नाही (किंवा आहे असं समजा फार तर.) पण सांगतोय ते वेगळंच. मोदी यांचे जे दुर्गुण अनेकांना वाटतात, ते ब-याच जणांना गुणही वाटतात हे इथं स्पष्ट करायचं आहे. एक लक्षात घ्या, भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाचे इतके दुर्गुण सातत्यानं कोणी मांडलेले नाहीत, त्यांचा इतका कोणी राग-द्वेष केलेला नाही. (हा व्हॉट्सअॅपोत्तर- पोस्टव्हॉट्सअॅप पंतप्रधान आहे हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे. पण ते पुढं कधी तरी) पण इतकं असूनही मोदी टिकून आहेत-याचं कारण तुम्हाला जे दुर्गुण वाटत आहेत, त्याच्या पॉझिटिव्ह बाजूंकडं बघणारा एक वर्ग आहे आणि त्याचं प्रमाण मोठं आहे.

मोदीविरोधक खूप आहेत हे मान्य आहे आणि त्यांचा अनादर करण्याचं काहीच कारण नाही- कारण ते काही प्रत्येक वेळी कुहेतूंनी भांडत आहेत असं नाही. त्यांना मोदी हुकूमशहा वाटतात, निष्ठूर वाटतात, माणूसघाणे वाटतात-पण त्यांना असं वाटत असताना ब-याच वर्गाला तसं वाटत नाही-किंबहुना याच गोष्टीची दुसरी बाजू ते बघत आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मोदीविरोधक-मोदीसमर्थक असे तट पडले आहेत. मोदीविरोधक कट्टर आहेत-म्हणून मोदीसमर्थक कट्टर होत आहेत आणि मोदीसमर्थक कट्टरपणे काही सांगत आहेत- म्हणून मोदीविरोधक कट्टरपणे उत्तर देत आहेत, हे इथं सांगायचंय. कोणत्याही व्यक्तीला विरोधक लवकर होऊ शकतात हे मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे- पण त्याच वेळी समर्थक इतके होणं आणि ते कायम राहणं हेही थोडं वेगळंच. हे सगळेच लोक वेडे आहेत असं आपण कसं म्हणू शकतो.

narendra modi

केवळ व्हॉट्सअॅपवरच्या पोस्टमुळं किंवा फेसबुकवरच्या कॉमेंट्समुळं इतके समर्थक तयार होत नाहीत, असंही मला वाटतं. लोक थोडी दुसरी बाजूही तपासून बघत असतात, हेतू लक्षात घेत असतात. हा केवळ `मास हिस्टेरिया` नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा समाजशास्त्रीय विचारसुद्धा केलाच पाहिजे. टोकाचा विरोध हाच काही वेळा टोकाचं प्रेम मिळायला कारणीभूत ठरतो. मोदी यांच्याबाबतीत तेच होत नाही ना, हे तपासून बघायला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why people criticizes PM Narendra Modi written by Mandar Kulkarni