Loksabha 2019 : जीव देईन पण भाजपशी समझौता करणार नाही : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

- भाजपला फायदा होईल असा उमेदवार दिलेला नाही

- कोणत्याही परिस्थितीत भाजपशी समझौता करणार नाही.

रायबरेली : अभ्यास, संशोधन करून काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराला मी निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होऊ शकेल, असा एकही उमेदवार आम्ही दिलेला नाही, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले. तसेच मी जीव देईन पण कधीही भाजपशी समझौता करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने आघाडी केली. त्याबाबत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी यांनी भाजपविरोधात मोठी लढाई लढली आहे. एक नेता जो पूर्ण हिमतीने आणि पूर्ण धैर्याने भाजपविरोधात लढत आहे, हे संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे मी जीव देईन पण कोणत्याही परिस्थितीत भाजपशी समझौता करणार नाही.

तसेच राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर प्रियांका गांधी म्हणाल्या, एका बाजूला हुतात्मा जवानांच्या नावावर मतं मागितली जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला हुतात्मा झालेल्या व्यक्तीच्या मुलाच्या नागरिकत्त्वाचा पुरावा मागितला जात आहे. अशाप्रकारे पुरावा मागणे हा एकप्रकारे त्यांचा अपमान करण्यासारखेच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Never Compromise with BJP says Priyanka Gandhi