Loksabha 2019 : 'राजीव गांधी यांच्याविरुद्धचे आरोप चुकीचे'

शुक्रवार, 10 मे 2019

राजीव गांधी यांच्या 1987 मधील अधिकृत दौऱ्यावेळी सर्व राजशिष्टाचार पाळण्यात आले होते. त्या वेळी इतर कोणीही परदेशी पाहुणे उपस्थित नव्हते, असे रामदास आणि पसरिचा यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा वापर "वैयक्तिक टॅक्‍सी'प्रमाणे केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप माजी नौदल प्रमुख ऍडमिरल (निवृत्त) एल. रामदास यांनी आज फेटाळला. त्या वेळी आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसर असलेले व्हाइस ऍडमिरल (निवृत्त) विनोद पसरिचा यांनीही हे आरोप फेटाळले आहेत. 

राजीव गांधी यांच्या 1987 मधील अधिकृत दौऱ्यावेळी सर्व राजशिष्टाचार पाळण्यात आले होते. त्या वेळी इतर कोणीही परदेशी पाहुणे उपस्थित नव्हते, असे रामदास आणि पसरिचा यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्याबाबत केलेला दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असे व्हा. ऍडमिरल पसरिचा यांनी स्पष्ट केले. त्या वेळी नौदलाच्या दक्षिण विभागाची सूत्रे एल. रामदास यांच्याकडे होती.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, "आयएनएस विराटवर राजीव गांधी आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. त्या वेळी सर्व राजशिष्टाचार पाळण्यात आले. ते त्रिवेंद्रमहून लक्षद्वीपला जाताना विराटवर आले होते. "आयलंड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी'च्या बैठकीसाठी ते लक्षद्वीपला गेले होते.''