'सीवर्ल्ड'बाबत शिवसेनेने भूमिका जाहीर करावी

'सीवर्ल्ड'बाबत शिवसेनेने भूमिका जाहीर करावी

कणकवली : तोंडवळी-वायंगणीवासीयांनी सीवर्ल्ड प्रकल्पाला पाठिंबा दिला, मात्र आता शिवसेनेचे उदय दुखंडे आणि ज्यांच्या जमिनी या प्रकल्पाला जात नाहीत तेच विरोध करीत आहेत. या विरोधकांची शिवसेनेच्या खासदार, पालकमंत्री, आमदार यांनी समजूत काढावी. अन्यथा त्यांचीही विरोधाची भूमिका असेल तर तसे जाहीर करावे. आम्ही सीवर्ल्ड अन्यत्र नेण्यास तयार आहोत, असे भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज स्पष्ट केले. 


शिवसेना आणि भाजपमधील वाद हा राज्यपातळीवर होता. तो जिल्हापातळीवर येऊ नये, अशी सूचना आम्ही कार्यकर्त्यांना दिली होती. परंतु काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तो सिंधुदुर्गात आणला. आता या विषयावर जास्त ताणू नका अन्यथा जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा असेल, असा इशाराही श्री. जठार यांनी दिला.
येथील भाजप संपर्क कार्यालयात श्री. जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष रवींद्र शेटये, नगरपंचायत सेलचे शिशिर परुळेकर, श्री. सावंत आदी उपस्थित होते.
श्री. जठार म्हणाले, "सी वर्ल्ड प्रकल्पामुळे तोंडवळी-वायंगणीसह संपूर्ण जिल्ह्याचे अर्थकारण बदलणार आहे. अनेक पर्यटन उद्योग येथे येणार आहेत. जागतिक पातळीवरचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कुणाचाच विरोध असता नये. तसेच ज्यांचा विरोध असेल, त्यांच्या भावना, त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याची आमची तयारी आहे. परंतु शिवसेनेचे उदय दुखंडे व इतर काहींनी या प्रकल्पाला पुन्हा विरोध सुरू केला आहे. विरोध करणाऱ्या या मंडळींना आता पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची समजावायला हवे. ते शक्‍य नसेल तर शिवसेनेने या प्रकल्पाबाबतची आपली नेमकी भूमिका मांडायला हवी.
सी वर्ल्ड प्रकल्पासाठी आम्ही 500 एकर जागा तयार ठेवली आहे. मालवणवासीयांना हा प्रकल्प नको असेल तर तसे त्यांनी सांगावे. आम्ही हा प्रकल्प अन्य ठिकाणी परंतु सिंधुदुर्गातच करून दाखविणार आहोत. सी वर्ल्ड प्रकल्पाचे काम सध्या एमटीडीसी आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुरू असून सध्या चिन्हांकनाचे काम सुरू आहे. त्याला विरोध करणे हे चुकीचे आहे. या प्रकल्पाबाबत शिवसेना नेत्यांनी स्थानिकांशी चर्चा करावी. गरज वाटल्यास आम्हीही तेथे यायला तयार आहोत.
शिवसेना-भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादावर श्री. जठार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ""हा वाद मुळातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरू केला. निजामाचे बाप वगैरे विशेषणे त्यांनी लावली. त्याला प्रवक्ते माधव भांडारी यांनी उत्तर दिले. यात भांडारी यांनी काहीच चुकीचे लिहिलेले नाही, तर योग्य तीच भूमिका मांडली. या वादानंतर शिवसेना-भाजप नेत्यांनी राज्यपातळीवर संयमाची भूमिका घेतली होती. पण इथल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा तो वाद उकरून काढला आहे. सरकारमध्ये असताना मित्रपक्षांची एकमेकांवर टीका करणे चुकीचे आहे.‘‘ भांडणे ही बंद खोलीतच मिटवायला हवीत. या समन्वयासाठी आम्ही तयार आहोत तसं आवाहन देखील करीत आहेत असे श्री. जठार म्हणाले.‘‘

शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी भाजपसोबत भांडण करण्यापेक्षा सत्ता सोडायला हवी. होऊ दे मध्यावधी निवडणूक, आम्ही त्यासाठी तयार आहोत. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद हा शिवसेनेलाच अधिक अडचणीत आणणारा ठरणार आहे. त्यांनी अधिक ताणले तर सिंधुदुर्गचा पालकमंत्री भाजपचा असेल याचेही भान त्यांनी ठेवावे.
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष, भाजप

पळणाऱ्या शिवसैनिकांना आम्ही थांबवले
नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी सैरावैरा पळत होते. या पळणाऱ्या सैनिकांना आम्ही थांबवलं. थांबा.. पळू नका असे सांगत आम्ही राणेंच्याविरोधात उभे राहिलो. त्यावेळी दीपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक ही मंडळी कोठे होती? असा प्रश्‍न प्रमोद जठार यांनी आज व्यक्‍त केला. राणेंचे आव्हान आम्ही पेलले. त्यामुळेच सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपला कॉंग्रेसपुढे सक्षमपणे उभी राहू शकली असेही श्री. जठार म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com