esakal | सॉक्‍स आणि तेही बांबूपासून... होय आपल्या कोल्हापुरात बनताहेत बांबूच्या सुतापासून पायमोजे
sakal

बोलून बातमी शोधा

start up socks are made from bamboo yarn In Kolhapur

सिल्क, टेरिकॉट, सिंथेटीक अशा पद्धतीच्या कापडापासून (फॅब्रिक) बनविलेले पायमोजे जर सातत्याने वापरत असू तर भविष्यात आपल्या पायाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

सॉक्‍स आणि तेही बांबूपासून... होय आपल्या कोल्हापुरात बनताहेत बांबूच्या सुतापासून पायमोजे

sakal_logo
By
संजय पाठक

कोल्हापूर : येथील नवउद्योजक नवीनकुमार माळी यांनी तामिळनाडूमधील उद्योजकाच्या मदतीने बांबूपासून सूत तयार करून त्यापासून पायमोजे बनविण्याचे स्टार्ट अप्‌ सुरू केले आहे. हे पायमोजे नैसर्गिक साधन सामुग्रीपासून उपलब्ध कच्च्या मालापासून बनविलेले आहेत.  तब्बल चोवीस तासही पायमोजे परिधान केले तरी त्वचेला त्रास होणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

बांबूपासूनचे पायमोजे हे त्वचेसाठी खूप चांगले आहेत. थंडी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच आपल्या पायांचे आरोग्य आणि निगा चांगली राहण्यामध्ये या पायमोजांचा छान उपयोग होतो. हे पायमोजे त्याच्या वजनाच्या तिपटीपेक्षा जास्त पाणी शोषून घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यामूळे आपल्या त्वचेतील दमटपण शोषून घेऊन त्वचा थंड व कोरडी ठेवण्यास मदत करतात. बांबू पासूनचे पायमोजे अन्य कापडांपेक्षा मऊसूत असून ते दिवसभर वापरले तरी आपल्या पायांना अजिबात त्रास होणार नाही. जपानी वस्त्र उद्योजगांनी केलेल्या संशोधनानुसार हे पायमोजे वास विरहीत आहेत. त्यामुळेच दुर्गंधीपासून मुक्तता हा मोठा फायदा आहे. 

पायमोजे... सॉक्‍स... तशी अतिशय सहज उपलब्ध होणारी जिन्नस. कुठेही... कधीही...अन्‌ स्वस्तही...! पण तुम्हाला हे माहित्येय का, आपण जेव्हा सिल्क, टेरिकॉट, सिंथेटीक अशा पद्धतीच्या कापडापासून (फॅब्रिक) बनविलेले पायमोजे जर सातत्याने वापरत असू तर भविष्यात आपल्या पायाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. विशेषतः जे लोक दिवसातले आठ, दहा, बारा तास पायमोजे परिधान करतात व त्यांचे पायमोजे जर वर उल्लेख केलेल्या फॅब्रिकचे असतील तर त्यांना त्यांच्या वार्धक्‍यात नक्कीच पायाच्या त्वचेच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते...! याला वैधानिक इशारा म्हंटलं तरी चालेल. अर्थात जर कुणी अस्सल कॉटनच्या कापडाचे पायमोजे वापरत असतील तर असा त्वचेचा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. पण जर त्याही पुढे जाऊन जर आपल्याला पर्यावरणपुरक असे नैसर्गिक साधन सामुग्रीपासून उपलब्ध झालेल्या कच्च्या मालापासून बनविलेले पायमोजे उपलब्ध झाले तर, दहा - बारा काय तब्बल चोवीस तासही पायमोजे परिधान केले तरी त्वचेला त्रास होणार नाही...! अर्थात हे असे पायमोजे सध्या आपल्या सेवेत उपलब्ध झाले असून कोल्हापुरातील नवीनकुमार माळी यांनी चक्क शेतात उगवणाऱ्या बांबूपासून सूत तयार करत त्याचे पर्यावरणपुरक, त्वचेला अजिबात त्रास न होणारे, अजिबात दुर्गधी न पसरविणारे सूत बनवून त्यापासून अतिशय उत्तम दर्जाचे, मऊसूत, न टोचणारे पायमोजे तयार केले आहेत. त्यांच्या या स्टार्ट अप्‌ ला प्रतिक्षा आपल्या प्रतिसादाची... सहकार्याची...! याविषयी श्री. माळी यांच्याशी "सकाळ'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने केलेली बातचित अशी... 

या क्षेत्राकडे कसे वळला...? 
माझा गोकुळ शिरगावला बांबूपासून वस्तू बनविण्याचा कारखाना होता. त्यामध्ये बांबूपासून फर्निचरसह विविध वस्तू बनिवण्यात येत होत्या. त्याविषयी मला माहिती मिळाली. मग त्यातून तामीळनाडूतील एका उद्योजकाशीची ओळख झाली. त्यांची बांबूपासून विविध कपडे तयार करण्याची फॅक्‍टरी आहे. तेथे तयार झालेला सगळा माल यूएस व यूकेला जातो. इंडियात फक्त एक टक्का माल विकण्यात येतो. त्यांचे सर्व बिझनेस नेटवर्क, मालाची क्वालीटी पाहून मी फार प्रभावित झालो. तेथून मी त्यांना जॉईन झालो. पुढे मीही या व्यवसायात करिअर करण्याचा विचार माझ्या त्या तामीळनाडूत नव्याने झालेल्या मित्राला बोललो. तो तयार करत नसलेला ऍटम मी बनवावा असे आमच्या दोघात ठरले, अन्‌ असा एकच ऍटम होता तो म्हणजे सॉक्‍स, पायमोजे...! दुसरे म्हणजे या प्रोजेक्‍टला तुलनेने गुंतवणूक कमी होती. म्हणून मीही याला प्राधान्य दिले. 

गुंतवणूक, मशिनरी, स्किल्ड वर्क, कच्चा माल हे सारे कसे जमवले...? 
पूर्वी मी एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होतो. त्यामुळे माझे पर्सनल सेव्हिग्ज होतेच. ते पैसे मी माझ्या या उद्योगासाठी वापरले, गुंतवणूक केली. काही मशिनरी जुन्या मिळवल्या, तर काही मशिनरी तैवानमधून नवीन मागवल्या. या मशिनरी खूपच अत्याधुनिक असल्याने याला कुशल, अकुशल असे कोणत्याच पद्धतीचे कामगार लागत नाहीत, त्यामुळे मला कुशल कामगारांचा काही प्रॉब्लेम आला नाही. नाही म्हणायला थोडेफार कुशल व अकुशल कामगार लागले ते मला उपलब्ध झाले. कच्च्या मालाचे म्हणाल तर, मी तेव्हापासून आजतागायत तामीळनाडूतील उद्योजक मित्राकडून घेत आहे. त्यापासून पक्का माल येथे म्हणजे कोल्हापुरात बनवत आहे. 

सध्या उत्पादन किती घेत आहात, त्याचे मार्केटींग कसे करत आहात...? 
सध्या बांबूपासूनच्या उत्पादनांना म्हणावा तसा ग्राहक भेटत नाही. अर्थात ही माझ्या व्यवसायाची सुरूवात आहे, माझा हा संघर्षाचा काळ आहे, पण भविष्यात मला यात नक्कीच मोठ्याप्रमाणावर ग्राहक भेटतील असा विश्वास वाटतो. सध्या मशिनच्या क्षमतेच्या दृष्टीने खूपच कमी उत्पादन घेत आहे, त्यामुळे मालाची किंमत सर्वसामान्यांना जास्त वाटावी अशी आहे. म्हणजे पायमोजाची एक जोडी साधारणतः दोनशे रूपयांना विक्री करावी लागते. यावरून आपणांस अंदाज येईल की अन्य कापडाचे पायमोजे आणि बांबूपासूनच्या सुतापासून तयार केलेल्या पायमोज्याच्या किंमतीत किती फरक आहे ते, पण याची दुसरी बाजू अशी आहे, की माझ्या या स्टार्ट अप ला जर नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला तर मशिनच्या क्षमतेनुसार मला उत्पादन घेता येऊन मालाचे निर्मिती मूल्य कमी होऊन विक्री किंमतही घटू शकेल. मार्केटींगचे म्हणाल तर www.bamboosocks.in ही आमची वेबसाईट आहे. तसेच सध्या मी माझ्या फेसबुक पेजवर याची जाहिरात करत आहे, माझ्या व्टिटर हॅंडलवरही मी याविषयीचे फोटोग्राफ्स माहिती शेअर करत आहे. याशिवाय विविध ठिकाणी लागणाऱ्या प्रदर्शन व विक्री या इव्हेंटच्या ठिकाणी जाऊन मी स्वतः स्टॉल लावून मालाची विक्री करत आहे. तेथे मी स्टॉलपुढे लावलेले फलक वाचून ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यातून "माऊथ टू माऊथ पल्बिसिटी' होते. यातून मला ग्राहकवर्ग लाभत आहे. अर्थात ही संख्या खूपच मर्यादित आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील नॉर्थ इस्ट बांबू डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत ऑनलाईन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनातही मी उत्पादनासह सहभाग नोंदवला होता. त्याचा फायदा होऊन बांबूपासूनच्या या उत्पादनाची देशभर चर्चा झाली. त्यातून ग्राहक फारसे लाभले नाहीत, परंतु मालाची चर्चा मोठ्याप्रमाणावर झाली. 

उत्पादन खर्च, विक्री आणि नफा यात मेळ बसतोय का...? 
माझ्याकडे असलेल्या मशिनरींची उत्पादन क्षमता मोठी आहे. त्याप्रमाणत विक्री, ग्राहक नाहीत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. त्याचा परिणाम विक्री आणि नफ्यावरही होत आहे. पण जर विक्री वाढू लागली तर उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. पर्यायाने नफ्यातही वाढ होऊ शकते. परंतु सध्याचे म्हणाल तर पूर्णपणे नुकसानीत, केवळ काहीतरी वेगळे करायचे या ध्येयाने प्रेरित असल्याने हे काम सुरू ठेवलेय. उत्पादन खर्च आणि नफ्याचे गणित पूर्णतः व्यस्त आहे. यामध्ये नफ्याचे सोडा पण किमान उत्पादन खर्च जरी निघाला तरी खूप असे खेदाने म्हणावे लागेल. 

भविष्यात व्यवसाय वाढीसाठी काही नियोजन केले आहे का...? 
पर्यावरण पुरक असे बांबूचे पायमोजे मोठ्याप्रमाणावर वापरले जावेत यासाठी माझे व्यक्तिगत स्वरूपात खूप प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या शहरात काही व्यापाऱ्यांना भेटून हे पर्यावरण पुरक असे पायमोजे विक्रीसाठी त्यांच्या शो रूममध्ये डिस्प्ले करण्याविषयी विनंती करत आहे. काही ठिकाणी विक्री प्रतिनिधी नियुक्त केले आहेत, परंतु सर्व गोष्टी पैशाशी निगडीत असल्यामुळे त्याचा फारसा फायदा पायमोजे विक्रीस अद्यापतरी होताना दिसून येत नाही. 


दुसरे म्हणजे, हल्ली एकमेकांना कोणत्या नं कोणत्या कारणाने गीफ्ट देण्याचा फंडा समाजामध्ये जोमात आहे. त्याचा फायदा घेण्याचे नियोजन केले आहे. म्हणजे पायमोज्यांच्या चार, सहा, बारा जोड्यांचे गीफ्ट हॅम्पर बनवत आहे. त्याचे आकर्षक असे बॉक्‍स नुकतेच तयार होऊन आले आहेत. कदाचित नव्या वर्षापासून आमचे हे गीफ्ट देण्यासाठीचे प्रॉडक्‍ट मार्केटमध्ये असेल. याला रिस्पॉन्स मिळावा अशी मनोमन इच्छा आहे. मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की तर आणि तरच या माझ्या स्टार्ट अप ला बरे, चांगले दिवस येतील. अन्यथा नुकसानी किती दिवस स्टार्ट अप, स्टार्ट अप म्हणत सुरू ठेवायचे. माझ्या या स्टार्ट अप्‌ ला वेगाने वाढविण्यासाठी नेटवर्कची आवश्‍यकता आहे. आता मला हवीय ती मॅनेजमेंट ब्रॅंडच्या रूंदी आणि या स्टार्ट अपच्या विस्तारीकरणासाठी आणखी थोडे भांडवल. 

बांबू पासूनच्या पायमोजाचे ग्राहक हिताचे फायदे काही सांगू शकाल का...? 
अरे व्वा, काही नाही सांगू शकणार... गुड क्वशन... या स्टर्टअप्‌ ने आपल्या रोजच्या जीवनात छान बदल घडवून आणला आहे. बांबूपासूनचे पायमोजे हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असल्यामुळे त्वचेसाठी खूप चांगले आहेत. थंडी आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच आपल्या पायांचे आरोग्य आणि निगा चांगली राहण्यामध्ये या पायमोजांचा छान उपयोग होतो. हे पायमोजे त्याच्या वजनाच्या तिपटीपेक्षा जास्त पाणी शोषून घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यामूळे आपल्या त्वचेतील दमटपण शोषून घेऊन त्वचा थंड व कोरडी ठेवण्यास मदत करतात. यामुळे आपल्या पायांना आरामदायी आणि सूखदायी असा अनुभव मिळतो. बांबू पासूनचे पायमोजे अन्य कापडांपेक्षा मऊसूत असून हे पायमोजे धुता येतात. उच्च प्रतीचे बांबूपासूनचे पायमोजे दिवसभर वापरले तरी आपल्या पायांना अजिबात त्रास होणार नाही. जपानी वस्त्र उद्योजगांनी केलेल्या संशोधनानुसार बांबू पासूनचे पायमोजे 70 टक्के वास विरहीत आहेत. त्यामुळेच दुर्गंधीपासून मुक्तता हा मोठा फायदा आहे. म्हणून मी तर म्हणेन हे स्टार्ट अप भविष्यातील गरज आत्ताच ओळखून वाटचाल करत आहे.

संपादन- अर्चना बनगे
 

loading image
go to top