#MarathaKrantiMorcha ‘...तर उद्रेकाला सरकार जबाबदार’ - उदयनराजे

Udayanraje-Bhosale
Udayanraje-Bhosale

पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार असूनही राज्यकर्ते, प्रशासन आणि न्यायव्यवस्था वेळकाढूपणा करीत आहे. त्यातूनच लोकांच्या भावना तीव्र होत असल्याकडे लक्ष वेधत खासदार उदयनराजे भोसले यांनी तातडीने मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली.

यासंदर्भात राजकर्त्यांना निवेदन दिले जाईल. त्यावर निर्णय न झाल्यास निर्माण होणाऱ्या उद्रेकाच्या परिस्थितीला तेच जबाबदार असतील, असा इशाराही भोसले यांनी दिला. सरकारला आता पहिले आणि शेवटचे निवेदन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांची पुण्यात भोसले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक झाली. त्यानंतर भोसले यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. 

ते म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यकर्ते चालढकल करीत आहेत. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडतो आहे. केवळ इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारणामुळे आरक्षणाकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यकर्ते न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरत असून, काही तरुणांना जीव गमवावा लागला. अशा घटनांनंतर मदतीचा ओघ सुरू होतो; पण माणूस देणार का?’’ मागण्यांकडे सातत्याने काणाडोळा केल्यानेच ही आक्रमकता वाढली आहे; पण हे सरकारला का कळत नसावे? तरीही लोक संयम राखत आहेत. मात्र, त्याचा उद्रेक होऊ शकतो. तेव्हा खरे परिणाम भोगावे लागतील.’’ 

‘‘मराठा समाजासह धनगर, मुस्लिमांना आरक्षण देणार आहात की नाही, हे स्पष्ट सांगितले पाहिजे. ते देणार असाल तर द्या, नसेल तर नाही म्हणा; पण भूमिका स्पष्ट करा. मग पाहू. उगाचच कागदी घोडे नाचवू नका. न्यायासाठी कायदा हातात घेतला, तर त्याला जबाबदार कोण? भीषण परिस्थिती उदभविण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, उगाचच दिशाभूल करू नका. तसे झाल्यास लोकांना रोखणे अशक्‍य होईल. मी तरी त्यांना कसे रोखणार? त्यामुळे त्यांचा अंत पाहू नका,’’ असेही भोसले यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘आत्ता वेळकाढूपणा करून निर्णयावेळी आचारसंहितेचे कारण दाखविले जाईल. तसे झाल्यास निवडणुकीचा निकाल काय असेल? हे सांगायला नको.’’ दरम्यान, येत्या नऊ ऑगस्टला होणारे आंदोलन शांततेत करावे, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com