#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 July 2018

हे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. 

महाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता?  
आमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.
ई-मेल कराः  webeditor@esakal.com  
Call Center : 9225800800

समाज आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. एक संस्कृती, एक सुरक्षित वातावरण, संधी अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश होते. मात्र आपण समाजाला काय देतो याचाही विचार होणे आज महत्त्वाचे आहे. अर्थात एका कोणाचेही हे काम नाही आपण सर्वांनी एकत्र येऊन यासाठी काम करण्याची गरज आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या माध्यमातून कामगारांना प्रशिक्षित करून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.   

आज देशात शेतीनंतर बांधकाम व्यवसाय हा दुस-या क्रमांकावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे. मात्र असे असले तरीही या व्यवसायात कुशल कामगार निर्माण व्हावेत यासाठी अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नव्हते. हेच लक्षात घेत कॉन्फीडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई - पुणे मेट्रोने केंद्र सरकारच्या नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर एकत्रितपणे ‘कुशल’ या कामगारांसाठीच्या उपक्रमाला सुरुवात केली.       

या उपक्रमा अंतर्गत गवंडीकाम, सुतारकाम, प्लंबिंग ही आणि यांसारखी अनेक काम करणा-या कामगारांना बांधकाम साईट्सवर प्रशिक्षण देण्यास क्रेडाईने सुरुवात केली. हे प्रशिक्षण शास्त्रशुद्ध असुन याचा फायदा कामगारांना आपली कार्यक्षमता वाढविण्याबरोबरच आपले उत्पन्न वाढवायलाही झाला हे विशेष. याच अंतर्गत गेल्या ६ वर्षांच्या कार्यकालात तब्बल १३५ डेव्हलपर्सच्या २७५ बांधकाम साईट्सवर तब्बल ३५ हजार कामगारांना प्रशिक्षित आणि प्रमाणित देखील करण्यात आले आहे. इतकेच नाही तर या उपक्रमा अंतर्गत २६०० कॉन्ट्रॅक्टर्स देखील प्रशिक्षित करण्यात आले आहेत. याबरोबरच मागील काही वर्षांत ब्राझील, न्यूझीलंड आणि दुबई येथे झालेल्या वर्ल्ड स्कील्स स्पर्धेत कुशल अंतर्गत प्रशिक्षित कामगारांनी सहभागी होत पदके देखील जिंकली आहेत या कामगारांचे हे यश आम्हाला आणि कामगारांना देखील बळ देणारे आहे.      

हे सर्व करीत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे महिला कामगारांच्या प्रशिक्षणाची. आतापर्यंत महिला कामगारांना पुरुष कामगारांपेक्षा निम्मा मोबदला दिला जायचा. याबरोबरच त्यांचा वापर हा केवळ मदतनीस म्हणूनच केला जायचा. मात्र आजच्या महिला सक्षमीकरणाच्या जमान्यात महिला कामगारांदेखील कामाचे योग्य प्रशिक्षण देत त्यांनाही स्वावलंबी बनविण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून 'क्रेडाई पुणे मेट्रो'च्या 'वूमन्स विंग'तर्फे 'कुशल' या कार्यक्रमाअंतर्गत गृहबांधणी प्रकल्पांवर नुकतेच गवंडीकामाचे प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमातील पहिल्या ३० महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गवंडीकाम करण्यासाठी या महिला आता सज्ज झाल्या आहेत. येत्या काही दिवसात हे प्रशिक्षन घेतलेली दुसरी बॅच देखील बाहेर पडत आहे. कौशल्याचे काम शिकल्यामुळे या महिलांच्या उत्पन्नात २० ते ३० टक्क्यांनी वाढ नक्की होईल असा आमचा विश्वास आहे मात्र याबरोबरच त्यांच्या मधील आत्मविश्वास देखील वाढीस लागला आहे हे महत्त्वाचे.
  
नजीकच्या भविष्यात कुशल अंतर्गत आणखी काम करण्याचे क्रेडाई पुणे मेट्रोचे ध्येय असून या अंतर्गतच पुढील वर्षभरात तब्बल दहा हजार कामागारांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. हे करीत असताना ब्रिज आरपीएल आणि अनेक सरकारी योजनांच्या मदतीने हे काम हाती घेण्यात येणार असून याचा फायदा अधिकाधिक कामगारांना होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल.     

आज राज्यात बांधकाम क्षेत्रात सुमारे २७ लाख कामगारांपेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत मात्र केवळ ६ लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे ही सत्य परिस्थिती आहे. क्रेडाई पुणे मेट्रो हीच बाब लक्षात घेत कामगार नोंदणीसाठी देखील पुढाकार घेत आहे. नजीकच्या भविष्यात आम्ही क्रेडाईच्या मदतीने ही नोंदणी करीत कामगारांना त्यांचा हक्क आणि सोयी देण्यासाठी प्रयत्नशील राहू. याबरोबरच कामगारांना प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण सेंटर वाढविण्यावर देखील आमचा भर असणार आहे.

विशेष म्हणजे क्रेडाई पुणे ही देशातील एकमेव संस्था आहे जिच्या मदतीने शासन कामगारांसाठी कार्यरत रहात आहे. याबरोबरच महारेराशी संलग्नपाने होत असलेले हे कार्यक्रम कामगारांसाठी देखील उपयुक्त ठरताना पहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या :
#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SakalForMaharashtra Shrikant Paranjape writes about Sakal For Maharashtra Come Together