जगभर नाचक्की झाल्यानंतर गडकरींना आली जाग 

संकेत कुलकर्णी
Saturday, 2 November 2019

  • अजिंठा रस्ता आठ दिवसांत दुरुस्त करा
  • सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली तंबी
  • सकाळच्या वृत्ताची न्यायालयाने घेतली होती दखल  
  • आतापर्यंत गेले सुमारे ७० बळी

औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिल्याचे त्यांनी शनिवारी (ता. दोन) जाहीर केले आहे. 

aurangabad jalgaon road
गेल्याच महिन्यात या रस्त्यावर झालेला अपघात

औरंगाबादपासून जळगावपर्यंत दोन्ही बाजूंनी खोदून ठेवलेला महामार्ग प्रवासासाठी गेल्या दीड वर्षांपासून धोकादायक बनला आहे. एकेरी वाहतुकीमुळे कोंडी होऊन प्रवाशांचा खोळंबा होत आहे. प्रचंड धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एव्हढेच नव्हे, तर या धोकादायक रस्त्यावर आतापर्यंत सुमारे 70 जणांचे बळी गेले आहेत. खराब रस्त्यावरील धडधडीमुळे वाहनांचे सस्पेन्शन खराब झाल्याच्याही तक्रारीही लोकांनी केल्या आहेत. 

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावरील पूल वाहून गेला. वाहने फसली, अपघात झाले. कित्येक प्रवाशांनी सोशल मीडियावर याची छायाचित्रे, व्हिडिओ टाकून हा मुद्दा लावून धरला. मात्र, तांत्रिक बाबींत अडकलेले या रस्त्याचे काम काही मार्गी लागले नाही. इतके झाल्यानंतर अखेर नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना आदेश दिल्याचे अधिकृत ट्विटर हॅंडलवरून जाहीर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. 

aurangabad jalgaon road
जागोजाग खोदकामामुळे उडणारी प्रचंड धूळ

बड्या पुढाऱ्यांच्या मतदारसंघातील काम 

खुद्द विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या तिघांच्या मतदारसंघातून हा मार्ग जातो. "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची विशेष दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिकाही दाखल करून घेतली होती. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून जाब विचारला होता. मात्र, तरीही निगरगट्ट प्रशासन हलले नाही. अखेर दीड वर्षांनी जाग आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला शनिवारी (ता. 2) आठ दिवसांची मुदत दिली. 

aurangabad jalgaon road


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari ordered PWD to make Aurangabad Ajanta Jalgaon Road within 8 days