'बाभळी'च्या बॅकवॉटरने 300 हेक्‍टर शेती बुडाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

धर्माबाद : पूर्ण क्षमतेने भरलेल्या बाभळी बंधाऱ्याचे सर्व 14 दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये तब्बल 300 हेक्‍टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. 

धर्माबाद : पूर्ण क्षमतेने भरलेल्या बाभळी बंधाऱ्याचे सर्व 14 दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमध्ये तब्बल 300 हेक्‍टर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. 

Nanded news Babhli
पाणी शेतात घुसल्याने नुकसान झालेले कापसाचे पीक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंगळवारी (ता. 29) बहुचर्चित बाभळी बंधाऱ्याचे सर्व 14 दरवाजे त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बंद करण्यात आले. यावर्षी 2.74 टीएमसी क्षमतेचा हा बंधारा परतीच्या पावसाने पूर्ण भरला आहे. उद्घाटनानंतर सहा वर्षात पहिल्यांदाच भरलेल्या या बंधाऱ्याचे दरवाजे बंद केल्याने बॅकवॉटर आसपासच्या शेतात घुसले आणि उभी पिके बुडाली. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या बॅकवॉटरने जवळपास 300 हेक्‍टर शेती पाण्याखाली आली आहे. 

Nanded news

दरवाजे बंद करताना बंधाऱ्यात 0.51 टीएमसी पाणीसाठा होता. पण दोन दिवसांत झालेल्या पावसाने, तसेच विष्णुपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडल्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली. यामुळे बॅकवॉटर परिसरात असलेल्या माष्टी, बाभळी, शेळगाव, चोळाखा, रोषनगाव, चिरली, टाकळी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच परतीच्या पावसाने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांवर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरने शेतीचे नुकसान झाल्याने दुहेरी संकट ओढवले आहे. 

शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

या बंधाऱ्याचे उदघाटन 2013 साली झाले. उदघाटनाच्या वर्षभरापूर्वी म्हणजेच 2012 साली शासनाच्या भूसंपादन विभाग व पाटबंधारे विभागाच्या वतीने बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे किती नुकसान होऊ शकते, याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सहा वर्षे झाली, तरी शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मावेजा दिला गेलेला नाही.

Nanded news
शेतांमध्ये शिरलेले बॅकवॉटर

यामुळे भूसंपादन व पाटबंधारे विभागाच्या कारभाराबाबत शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील बाधित गावांतील शेतकऱ्यांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 hector agriculture land comes under Babhli Backwater