Vidhan parishad : महायुतीचे अंबादास दानवे विक्रमी मतांनी विजयी

अंबादास दानवे
अंबादास दानवे

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 647 पैकी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला. शिवसेना-भाजप युतीचे केवळ 292 मतदार असताना श्री. दानवे यांनी आपल्या पारड्यात तब्बल 524 मते खेचून आणली. 

विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.19) मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी (ता.22) विमानतळासमोरील मेल्ट्रॉन कंपनीमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात झाली. श्री. दानवे विजयी होत असल्याचे लक्षात येताच आघाडीचे श्री. कुलकर्णी यांनी मतमोजणी केंद्र सोडले. त्यानंतरच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली. या निवडणुकीसाठी 657 मतदार होते. पैकी 647 मतदारांनी हक्‍क बजावला. त्यापैकी 14 मते बाद ठरत 633 मते वैध ठरली. श्री. दानवे 524 मते घेऊन विजयी झाले, तर श्री. कुलकर्णी यांना 106 मते मिळाली. अपक्ष शहानवाज यांना केवळ तीन मतांवर समाधान मानावे लागले. 

आघाडीचे उमेदवार श्री. कुलकर्णी यांनी मतदानाआधीच पराभव स्वीकारला की काय? अशी चर्चा त्यांनी घेतलेल्या बचावात्मक भूमिकेमुळे होऊ लागली होती. तर दुसरीकडे श्री. दानवे यांच्यासाठी शिवसेनेचे अनेक मंत्री, नेते औरंगाबाद-जालन्यात ठाण मांडून बसले होते. शिवसेना-भाजपने आपले संख्याबळ कायमच राखले नाही तर आघाडी, एमआयएम आणि अपक्षांची लक्षणीय मते आपल्याकडे खेचली. अब्दुल सत्तार समर्थक 117 सदस्यांनी देखील आपली मते दानवे यांच्या पारड्यात टाकली. शिवाय एमआयएम, अपक्ष, हर्षवर्धन जाधव समर्थक सदस्यांनीही महायुतीला मदत केल्याने श्री. दानवे विक्रमी मतांनी विजयी झाले. 
 
कुलकर्णींनी मतमोजणी केंद्र सोडताच जल्लोष 
मेल्ट्रॉन कंपनीत मतमोजणी सुरू असतानाच आघाडीचे उमेदवार श्री. कुलकर्णी तेथून बाहेर पडले. त्यांनी बाहेर पडल्यानंतर शिवसेना नेत्यांशी संवादही साधला. कुलकर्णी निघून जात आहेत, याचा अर्थ श्री. दानवेच विजयी झालेत, याचा अंदाज बांधलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली. त्यानंतर काही वेळातच अंबादास दानवे यांनी बाहेर येत माध्यम प्रतिनिधींना आपण विजयी झाल्याची माहिती दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com