पीककर्जाची स्थिती विचारताच पाशा पटेल भडकले 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 21 जून 2018

औरंगाबाद : राज्यातील बहुतांश भागात पीककर्जासाठी शेतकरी आजही बॅंकांचे उंबरठे झिजवत आहेत. सध्या पीककर्जाची स्थिती काय आहे, असा प्रश्‍न गुरुवारी (ता.21) पत्रकार परिषदेत उपस्थित करताच शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचा दावा करणारे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा चांगलाच पारा चढला. "मी काय म्हणतो, तेच ऐकून घ्या'', अशी भाषा वापरत त्यांनी संताप व्यक्‍त केला. पीककर्जाच्या प्रश्‍नावर पटेल यांना शेवटपर्यंत उत्तर देताच आले नाही. हे विशेष. 

दिल्ली येथे नुकतीच शेतमालच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यासोबत पाशा पटेल यांची बैठक झाली. याबाबत माहिती देण्यासाठी येथील उस्मानपुरा भागातील भाजपच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तासभर त्यांचे निवेदन ऐकून घेतल्यानंतर "राज्यातील पीककर्जाची स्थिती काय आहे', असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर "मी आजच दिल्लीहून महाराष्ट्रात आलोय. मला केवळ अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना ताळ्यावर आणल्याची माहिती आहे. कारण ते माझे मित्र आहेत. बाकीचे काहीही विचारू नका'', त्यांनी असा दम देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांनी "तुमचेच किती ऐकून घ्यायचे?, आम्ही काही प्रश्‍न विचारायचेच नाही का', अशा प्रश्‍नांचा भडीमार केल्यानंतर ते "विचारा, विचारा'' म्हणाले; मात्र शेवटपर्यंत प्रश्‍नांना निरुत्तर झालेल्या पटेल यांनी "35 ते 40 वर्षांपासून मी शेतकरी चळवळीत कसे काम केले'', असेच सांगत राहिले. 

प्रारंभी दुधाचा प्रश्‍न हा केवळ राज्याचा, देशाचा नसून तो आता जागतिक पातळीवरचा महत्त्वाचा प्रश्‍न झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण दिल्ली येथे दूध प्रश्‍नांबद्दल भेटी घेतल्या. दुधाचा प्रश्‍न मार्गी लावायचा असेल तर पावडर निर्यात करावे लागणार आहे. शिवाय, बटर, तुपावर लावण्यात आलेला 12 टक्‍के जीएसटीदेखील कमी करावा लागेल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्याह भोजनातही दुग्धजन्य पदार्थाचा वापर केल्यास यातून मार्ग निघू शकेल. खाद्यतेलाचा प्रश्‍नही कायम आहे. कृषीप्रधान देश म्हणतो आणि आजही आपल्याला 19 टक्‍के तेल आयात करावे लागते'', अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली. यावेळी दिलीप थोरात, व्यंकटेश कमळू, शिवाजी पाथ्रीकर, राम बुधवंत उपस्थित होते.
 
Web Title: asking question about the condition of the crop, Pasha Patel angry