बॅंकांचे टेन्शन वाढले! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

औरंगाबाद - एक ते सात तारखेच्या दरम्यान बहुतांश शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांचे पगार होतात. आता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा होण्यास सुरवात झाली असली, तरी जवळ कॅशच नसल्याने बॅंकांचे टेन्शन वाढले आहे. 

औरंगाबाद - एक ते सात तारखेच्या दरम्यान बहुतांश शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांचे पगार होतात. आता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा होण्यास सुरवात झाली असली, तरी जवळ कॅशच नसल्याने बॅंकांचे टेन्शन वाढले आहे. 

पगार देण्यासाठी जवळपास 600 ते 700 कोटी रुपयांची रक्कम लागणार आहे. मात्र, बॅंकांकडे आजघडीला 100 कोटींच्या जवळपास कॅश आहे. त्यामुळे आता सर्वांनाच कॅश मिळेल या दृष्टीने नियोजन करीत बॅंका एका खातेदाराला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याचा विचार करीत आहे. त्यातच दोन हजारांच्या नोटाच सर्वांधिक असल्याने खातेदारांसोबत हुज्जत होण्याची शक्‍यता आहे. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांचे एक तारखेलाच पगार होतात. यामध्ये या कर्मचाऱ्यांचीच रक्कम अडीच कोटींच्या घरात जाते. बॅंकांकडे शंभर कोटीच रुपये शिल्लक असल्याने आता एवढ्या कर्मचाऱ्यांना रक्कम द्यायची कशी, असा प्रश्‍न बॅंकांना पडला आहे. 

बॅंकांकडे वाढता कॅशचा तुटवडा 
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये कॅशचा मोठा तुटवडा आहे. नोटबंदीच्या 23 व्या दिवशीही बॅंकांमधील कॅशची परिस्थिती सुधारलेली नाही. शासनाने आपल्या खात्यातील कितीही रक्कम काढता येणार असे सांगितले, तरी बॅंका कॅशअभावी दोन ते दहा हजारांच्या आतच रक्कम देतात. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय या बॅंकांनी जवळपास साडेतीन हजार कोटींच्या जवळपास रकमेची मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे केली होती; मात्र अद्यापही रक्कम मिळालेली नाही. 

एटीएममध्ये खडखडाट 
बॅंकांमध्ये गर्दी कमी करण्यासाठी एटीएमची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. जेथे दोन हजारांची नोट आहे तेथे मोजकेच लोक पैसे काढतात. शहरातील अनेक एटीएममध्ये कॅश नसल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. काही एटीएमचे शटर्स 9 नोव्हेंबरपासूनच बंद करण्यात आले आहेत. यामध्ये पैसेच टाकण्यात आले नाहीत. काही राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे एटीएम सुरू असल्याने त्यांचाच नागरिकांना आधार आहे. आता पगार झाल्याने एटीएममध्येसुद्धा गर्दी वाढताना दिसते; मात्र येथेसुद्धा अडीच हजारांची मर्यादा आहे. ज्यांना यापेक्षा जास्त रक्कम हवी, त्यांना बॅंकेत रांगा लावाव्या लागत आहेत. 

आता पैसे काढण्यासाठी गर्दी 
नोटबंदीच्या निर्णयानंतर सुरवातीला पंधरा दिवस बॅंकेत जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी होत होती. आता पगार होण्यास सुरवात झाल्याने बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी वाढत आहे. पैसे जमा करण्याची रांग कमी आणि पैसे काढण्याची रांग मोठी होताना दिसते. बॅंकांकडे कॅश नसल्याने काही बॅंका तर पाच हजारांच्या आतमध्येच रक्कम खातेदारांना देतात. 

Web Title: Banks increased tension