लातूर : रात्री घरात आला प्रियकर, विवाहितेने लपवले कपाटात, मिळाला चोप

विलास कांबळे
रविवार, 21 जुलै 2019

हेर येथील एका विवाहित महिलेच्या घरी पती नसल्याची खात्री करून माहेरकडील विवाहपूर्व प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसल्याचे पाहून गावातील तरुणांनी त्या मजनूला बेशुद्ध होईपर्यंत चांगलाच चोप दिला. दरम्यान, विवाहितेने त्याला कपाटात लपवून ठेवले होते.

हेर (जि. लातूर) - हेर येथील एका विवाहित महिलेच्या घरी पती नसल्याची खात्री करून माहेरकडील विवाहपूर्व प्रियकर रात्रीच्या वेळी घरात घुसल्याचे पाहून गावातील तरुणांनी त्या मजनूला बेशुद्ध होईपर्यंत चांगलाच चोप दिला. दरम्यान, विवाहितेने त्याला कपाटात लपवून ठेवले होते. ही घटना हेर येथे 19 व 20 जुलैच्या मध्यरात्री घडली. 

हेर येथील एका तरुणाचे गेल्या दोन वर्षांपूर्वी नळेगाव येथील मुलीशी विवाह झाला होता व त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. त्या महिलेचे लग्नापूर्वीच गावातच राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु, ते प्रेम लग्नानंतरही कायम राहून दोघे सतत एकमेकांच्या संपर्कात होते. पती नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असे याचा फायदा घेऊन 19 जुलैला रात्री साडेअकराच्या सुमारास अमोल नावाचा प्रियकर मोटारसायकलवरून हेर येथे आला व मोटारसायकल घरापासून दूर असलेल्या ग्रामपंचायत कार्यलयाच्या बाजूला उभी करून त्या प्रियसीचे घर गाठले.

दरम्यान या अगोदरही अशीच घटना घडल्याने व या प्रकरणाची कुजबुज झाल्याने गावातील तरुण पाळत ठेवूनच होते. प्रियकर घरात जाताच आतून दार लावून घेतल्याने तरुणांनी घराचा दरवाजा ठोठावला. परंतु, आतून ती महिला बाहेर येऊन घरात कोणीही आले नसल्याचा कांगावा करू लागली. मात्र, तरुणांना प्रियकर घरात गेल्याची खात्री असल्याने आत जाऊन शोध घेतला असता कुठेही दिसत नसल्याने शेवटी कपाटाचे दार उघडले असता कपाटात तो दडून बसल्याचे दिसले. त्यास बाहेर काढून तरुणांनी बेदम चोप दिला असून तो प्रियकर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्याने पंचांनी पोलिसांना बोलावून घेतले होते.
 
पोलिसांच्या निगरानीत तरुणावर 20 जुलै रोजी दुपारी डॉ. एगाडे यांनी प्राथमिक उपचार करुन पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी उदगीरला पाठवून दिले. दरम्यान घडला प्रकार विवाहितेच्या आई वडीलांना सांगून बोलावून घेण्यात आले. तंटामुक्तीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, तुळशीराम बेंबडे, सोपानराव ढगे, पंडीत ढगे, अजिज पठाण आदी समितीच्या पंचांनी कसलाही वाद व प्रकरण चिघळू न देता दोन्ही पक्षांकडील म्हणण्यानुसार जागेवरच फारकतीचा निर्णय घेऊन तसा फारकतनामाच मुद्रांक पेपरवर लिहिला व विवाहितेला तिच्या एक वर्षाच्या मुलीसह माहेरच्या नातलगांसोबत सुखरूप पाठवून दिले. यामुळे या घटनेची गावभर चालु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caught with lover at Her dist Latur