#MarathaKrantiMorcha मराठा आंदोलकांवरील गुन्हे सूडबुद्धीने - धनंजय मुंडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

मुंबई - मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. 

मुंबई - मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची राज्य सरकारची कारवाई सुडाची असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. सरकारने ही सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली. 

मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याजिल्ह्यात लाखोंचे 58 मूक मोर्चे काढले. या 58 मोर्चांनी शांतता, संयम आणि शिस्तीच्या संदर्भात जगात आदर्श निर्माण केला. जगात आदर्श निर्माण करणाऱ्या या मोर्चांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका मात्र आकसाची राहिली आहे. मूक मोर्चाची सरकारने गंभीर दखल न घेतल्यामुळे अखेर ठोक मोर्चाची घोषणा केली गेली, त्याकडेही गांभीर्याने पाहण्यात आले नाही. शेवटी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलपूजा करण्यापासून मुख्यमंत्री महोदयांना रोखण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. त्यानंतर मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली प्रतिक्रिया तसेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांच्या यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले, त्याच्या परिणामस्वरूप मराठा आंदोलन चिघळले हे वास्तव आहे. 

मराठा आंदोलन चिघळण्यास सरकारची बेपर्वाई, बेजबाबदार, असंवेदनशील वृत्ती आणि सहकारी महोदयांची चिथावणीखोर वक्तव्ये कारणीभूत असताना, त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मराठा आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसक कृत्ये, खुनाचा प्रयत्न असे गंभीर आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात येत आहे. या कारवाईमुळे मराठा समाजातील तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होणार आहे. जे सरकार मराठा तरुणांचे आयुष्य घडविण्यास असमर्थ आहे, त्या सरकारला निरपराध तरुणांवर खोटे आरोप ठेवून गंभीर गुन्ह्यांत गोवण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मराठा आंदोलक युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे मराठा समाजात सरकारविरुद्ध प्रचंड चीड, संताप आहे. या संतापाचा उद्रेक होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता आहे. मराठा आंदोलनाच्या पहिल्या आठ दिवसांत निष्क्रिय राहिलेल्या सरकारने, आपले अपयश लपविण्यासाठी अशी सुडाची कारवाई करणे तात्काळ थांबवावे, अशी विनंती श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

Web Title: Criminal revelations on Maratha protesters says Dhananjay Munde