अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. मुंडे दांपत्यासह तिघांना सक्तमजुरी 

Dr. munde couple
Dr. munde couple

बीड - अवैध गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी परळी येथील डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे यांच्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा अतिरिक्‍ति सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी शुक्रवारी (ता. आठ) हा निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

धारूर तालुक्‍यातील विजयमाला महादेव पटेकर हिला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना महादेव पटेकर याने 17 मे 2012 रोजी तिला डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे यांच्या परळीतील मुंडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हे याच्या रुग्णालयात तातडीने करून घेतलेल्या गर्भलिंग निदान चाचणीत मुलगीच असल्याचे समोर आले. मुंडे दांपत्याच्या हॉस्पिटलमध्ये 18 मे रोजी विजयमालाचा गर्भपात करण्यात आला. त्यावेळी अतिरक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. रुग्णालयास परवानगी नसतानाही मुंडे दांपत्याने विजयमालाचा गर्भपात केला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन परळीत विविध कलमांन्वये डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे, महादेव पटेकर व इतर अशा एकूण 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बीड जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी सरकारी पक्षाचे साक्षी-पुरावे ग्राह्य धरून डॉ. सुदाम मुंडे, डॉ. सरस्वती मुंडे, मृत विजयमालाचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवत विविध कलमांन्वये दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील 17 आरोपींपैकी तिघांचा मृत्यू झाला. उर्वरित 14 पैकी तिघांना शिक्षा तर 11 जणांची सबळ पुराव्याअभावी मुक्‍तता करण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गाडेकर, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी स्वाती भोर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले. 
 

दंडाची रक्कम विजयमालाच्या मुलींना 
मुंडे दांपत्यासह पटेकरला न्यायालयाने सुनावलेली दंडाची रक्कम विजयमालाच्या मुलींना दिली जाणार आहे. तिच्या चार मुली आहेत. 
 

तरीही निर्ढावलेलाच चेहरा 
न्यायालयाने डॉक्‍टर मुंडे दांपत्यास शिक्षा सुनावल्यावर सुदाम मुंडे याने मान हलवत शिक्षा कबूल केली; मात्र त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही गंभीर भाव आढळले नाहीत. 
 
यापूर्वीही झाली होती शिक्षा 
डॉ. सुदाम मुंडे याच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर "लेक लाडकी अभियान'च्या प्रमुख ऍड. वर्षा देशपांडे, ऍड. शैलजा जाधव यांनी स्टिंग ऑपरेशन केले होते. सातारा येथून एका गर्भवतीला डमी रुग्ण म्हणून 19 सप्टेंबर 2020 रोजी मुंडेच्या रुग्णालयात पाठवले होते. डॉ. मुंडेने पाचशे रुपयांत तिची सोनोग्राफी करून मुलगा असल्याची चिठ्ठी देऊन सांगितले होते. याप्रकरणी 15 जून 2015 ला परळी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवत त्यांना चार वर्षे कैद व 80 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. 
 

साडेसहा वर्षे शिक्षा भोगून पूर्ण 
विजयमाला पटेकर हिचा मृत्यूनंतर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर डॉ. मुंडे दांपत्य फरारी होते. 18 जून 2015 ला ते पोलिसांना शरण आले. तेव्हापासून डॉ. सुदाम मुंडे नाशिक येथील कारागृहात होता. त्याची पत्नी मात्र बाहेर होती. डॉ. सुदाम मुंडेने आतापर्यंत याप्रकरणी साडेसहा वर्षे शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला यापुढे केवळ साडेतीन वर्षे शिक्षा भोगावी लागेल तर त्याची पत्नी यापुढे दहा वर्षे शिक्षा भोगणार आहे. महादेव पटेकर हा निकालाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सहा फेब्रुवारीला पळून गेला आहे. न्यायालयाने त्याचे वॉरंट जारी केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com