Vidhan Sabha 2019 : मुंडे भाऊ-बहिणीच्या लढतीकडे लक्ष 

- दत्ता देशमुख 
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

बीड जिल्ह्यात विविध संस्थांवर वर्चस्व आणि लोकसभेतही मोठ्या फरकाने विजयाने भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलाय; पण विधानसभेला महायुतीतील जागावाटपाचा वाद जिल्ह्यात उफाळणार आहे. काही ठिकाणी आमदारांचे तिकीट कापण्यावरूनही डोकेदुखी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही तरुण चेहऱ्यांसह मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. परळीत मुंडे बहीण-भाऊ आणि बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्यांतील लढतही रंगतदार होऊ शकते. 

विधानसभा 2019 : बीड जिल्ह्यात विविध संस्थांवर वर्चस्व आणि लोकसभेतही मोठ्या फरकाने विजयाने भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावलाय; पण विधानसभेला महायुतीतील जागावाटपाचा वाद जिल्ह्यात उफाळणार आहे. काही ठिकाणी आमदारांचे तिकीट कापण्यावरूनही डोकेदुखी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काही तरुण चेहऱ्यांसह मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. परळीत मुंडे बहीण-भाऊ आणि बीडच्या क्षीरसागर काका-पुतण्यांतील लढतही रंगतदार होऊ शकते. 

बीड जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व एकहाती पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र जिल्हा पातळीवरील नेतृत्वाचा अभाव आहे, त्यामुळे मतदारसंघापुरती 'सरकारकी' असे 'राष्ट्रवादी'चे धोरण आहे. जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्‍न आणि दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना, परळी मतदारसंघापुरते केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन त्याचेच द्योतक आहे. 

दरम्यान, 2014 मध्ये भाजपने सहापैकी पाच जागा जिंकल्या. 'राष्ट्रवादी' एक आणि शिवसेना शून्यावर बाद झाली. मात्र, मोदी लाट आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती असताना आणि बीडमध्येच नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही 'राष्ट्रवादी'कडून विजय मिळविणारे जयदत्त क्षीरसागर आता शिवसेनेत गेले आहेत. मात्र, याच जागेवरून आता महायुतीत पहिला वाद झडणार आहे. बीडच्या जागेवरूनच महायुतीत मिठाचा खडा पडू शकतो. जिल्ह्यात युतीत एकमेव बीडची जागा शिवसेनेकडे आहे, त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. याच वेळी महायुतीतील शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे येथूनच तयारी करीत असल्याने त्यांच्याकडूनही या जागेसाठी निश्‍चित जोर लागणार आहे. या दोघांसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर रिंगणात असतील. परळीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण-भावात लढत होईल, असे मानले जाते. अलीकडे मुंडे यांच्या पत्नीने वाढविलेला संपर्क पाहता नणंद-भावजय असाही सामना रंगू शकतो. त्यातच आघाडीत जिल्ह्यातील परळी हा एकमेव काँग्रेसच्या वाट्याचा मतदारसंघ असल्याने काँग्रेसकडूनही या जागेसाठी दावा 
सांगितला जात आहे. आष्टीत भाजपचे भीमराव धोंडे आमदार असले, तरी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचा मतदारसंघावर अधिक पगडा आहे. 
या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या 70 हजारांच्या मताधिक्‍याचे श्रेय धस यांनीच घेतले आहे. त्यांचे पुत्र जयदत्त यांचा वाढता राजकीय राबता आणि दरेकर यांच्यासोबतची सोयरिक ही विधानसभा निवडणुकीची पायाभरणीच होती, असे मानले जाते. त्यामुळे इथे भाजपअंतर्गत पेच होऊ शकतो. 'राष्ट्रवादी'कडून बाळासाहेब आजबे यांचे नाव आघाडीवर आहे. 

आडसकर, सोळंके रिंगणात 
माजलगावमध्ये भाजपचे आमदार आर. टी. देशमुख यांच्यावरील नाराजी आणि त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांना आराम दिला जाऊ शकतो. विधानसभेला पंकजा मुंडे यांना साथ आणि इतर संस्थांच्या विजयाचे गणित बांधण्याची सोय म्हणून माजलगावमध्ये रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळू शकते. 'राष्ट्रवादी'कडून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची उमेदवारी निश्‍चित आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला केजमध्ये भाजपच्या संगीता ठोंबरे आमदार आहेत. त्यांच्याविरोधात 'राष्ट्रवादी'कडून नमिता मुंदडा असतील. पूरक जातीय समीकरण ही भाजपची जमेची बाजू असली, तरी कामांमुळे नाराजी आणि रमेश आडसकर आणि थोरात गटाशी असलेले वितुष्ट या भाजपच्या उणिवा आहेत. जनसंपर्क आणि सामाजिक कामातील सातत्य या राष्ट्रवादीच्या जमेच्या बाजू, तर पक्षांतर्गत गटबाजी ही उणीव आहे. 

गेवराईत उमेदवारीच्या आशेने माजी मंत्री बदामराव पंडित शिवसेनेत गेले. लोकसभेला भाजपसाठी जोराने पळालेही; पण भाजपकडून आमदार लक्ष्मण पवार यांचीच उमेदवारी निश्‍चित मानली जाते, त्यामुळे बदामरावांपुढे पेचच आहे. 'राष्ट्रवादी'कडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांची उमेदवारी निश्‍चित आहे. 

वंचितमुळे रंगत येणार 
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने नव्वद हजार मतांचा पल्ला पार करून जिल्ह्यात ताकद दाखवली आहे. केज, परळी, गेवराई व माजलगाव; तसेच बीड विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी रंगत आणण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज साठे (केज), काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख (परळी) या नेत्यांनी वंचितसाठी मुलाखती दिलेल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight between panakja Munde and Dhananjay munde in Parali for vidhan Sabha 2019