‘नमों’चा प्रभाव सगळीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

शहरी असो वा ग्रामीण मतदार, महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदा; सर्वच निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाचे आकर्षण आढळून आले. मोदींच्या करिष्म्याला जोड मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची. त्यामुळेच भाजपला ‘मिनी विधानसभे’च्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळाले,

शहरी असो वा ग्रामीण मतदार, महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदा; सर्वच निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाचे आकर्षण आढळून आले. मोदींच्या करिष्म्याला जोड मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची. त्यामुळेच भाजपला ‘मिनी विधानसभे’च्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळाले, तर ‘गमावलेली विश्‍वासार्हता’ हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचे एक प्रमुख कारण असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर नेणाऱ्या प्रमुख महानगरपालिका आणि बहुतांश जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या निकालाने राजकीय जाणकारांची बोटे तोंडात गेली. मतदारांच्या या कौलामागे नेमके काय दडलेले आहे याचा शोध घेण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने राज्यव्यापी महासर्वेक्षण केले. सुमारे सव्वा लाख मतदारांच्या राजकीय ‘मूड’चा कानोसा घेतला असता, राज्याचे बदलते चित्र उलगडले. भाजपचा जनाधार वेगाने वाढतो आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची घसरण सुरू असल्याचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे आकर्षण संपले, मोदी लाट राहिली नाही, या समजाला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे. जिल्हा परिषदांमध्ये भाजप मुसंडी मारेल असे राजकीय जाणकारांना वाटले नव्हते; मात्र ग्रामीण भागात सत्ताबदलासाठी म्हणून आम्ही मतदान केले, असे तब्बल ६० टक्के मतदारांनी सांगितले. ज्यांनी भाजपला मतदान केले, त्याचे प्रमुख कारण मोदी यांचे नेतृत्व असल्याचे तब्बल निम्म्या मतदारांनी म्हटले आहे; तर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमाही मतदारांच्या मनात ठसल्याचे दिसते. मोदींच्या नेतृत्वानंतर भाजपला मतदान करण्याचे दुसरे मोठे कारण फडणवीस हेच आहेत.

दहा महापालिकांच्या निवडणुका झालेल्या शहरी भागातही तेथील सत्तेत परिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या मतदारांची संख्या ग्रामीण भागाएवढीच मोठी आहे आणि येथेही मोदींचा करिष्मा दिसला. मात्र, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता अधिक दिसली, तर याउलट फडणवीस यांची लोकप्रियता ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वाढलेली आढळून आली.

नेत्यांवरच विश्‍वास
एखाद्या पक्षाला मतदान करण्यामागे त्या पक्षाच्या नेतृत्वाला मतदारांनी सर्वाधिक महत्त्व दिल्याचे दिसते. भाजपला मतदान करणाऱ्यांमध्ये अशा मतदारांची संख्या जशी अधिक आहे, तसेच अन्य पक्षांना मतदान करणाऱ्यांमध्येही त्या पक्षाचे नेतृत्व हा प्रमुख मुद्दा आहे. शिवसेनेला मत देताना मतदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेच पाहिले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांपैकी सर्वाधिक मते शरद पवार यांच्या नेतृत्वामुळेच आहेत. काँग्रेसच्या बाबतीत मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळेच मतदान केले असे सांगणाऱ्यांची संख्या अन्य नेत्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण २९ टक्के, तर शहरी भागात ३७ टक्के आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्‍वास व्यक्त करणाऱ्या या पक्षाच्या मतदारांचे प्रमाण ग्रामीण भागात ५१ टक्के, तर शहरी भागात ४८ टक्के आहे.

पैशाचे राजकारण चालले नाही
मतदारांनी प्रश्‍नांना दिलेला प्रतिसाद पाहता त्यांच्या लेखी पैसा आणि जाती - धर्मांना अजिबात महत्त्व नसल्याचे आकडेवारी सांगते. मतदानासाठी महत्त्वाचे घटक
कोणते आहेत, या प्रश्‍नाचे उत्तर देताना अवघ्या दोन - तीन टक्के मतदारांनी हे मुद्दे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे, तर उमेदवारांच्या पार्श्‍वभूमीला आणि त्याच्या पक्षाला सर्वाधिक महत्त्व मतदारांनी दिले आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदान करतानाही मतदारांनी याच दोन्ही मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे दिसते.

Web Title: Marathawada - Vote Ki Baat