आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

"आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू'' असे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबादनंतर गुरुवारी (ता.एक) त्यांचे लातूर जिल्ह्यात आगमन झाले. येथे "आदित्य संवाद' कार्यक्रमात एका तरुणाने विचालेल्या प्रश्‍नावर त्यानी हे उत्तर दिले. 

लातूर - "आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू'' असे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबादनंतर गुरुवारी (ता.एक) त्यांचे लातूर जिल्ह्यात आगमन झाले. येथे "आदित्य संवाद' कार्यक्रमात एका तरुणाने विचालेल्या प्रश्‍नावर त्यानी हे उत्तर दिले. 

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मोठ्या शहरात ते "आदित्य संवाद' हा उपक्रम घेत आहेत. येथे केवळ संवाद नव्हता तर त्याला एका "रिऍलिटी शो'चे रूप दिले गेले होते. सोबत आणलेली अत्याधुनिक साऊंड सिस्टीमसह, तरुण-तरुणींना टी शर्ट, टोप्या, हातात फलक देऊन योग्य जागेवर बसवले गेले होते. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ठिकठिकाणी आदित्य ठाकरे व आदित्य संवादाचे फ्लेग्ज लावले होते. ठाकरे व्यासपीठावर येण्याआधी त्यांचे व्हिडिओ दाखवून वातावरण निर्मिती केली गेली. ते व्यासपीठावर येताच हारतुरे, सत्काराला फाटा देत सरळ त्यांनी तरुणांशी संवाद साधला. तरुणाईचाही त्यांना चांगला प्रतिसाद लाभला. 

गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा सुरू आहे. आजच्या संवादातही एका तरुणाने हा प्रश्न विचारला. त्यावर "आता निवडणुका येत आहेत. आधी भगवा फडकवू, नंतर मुख्यमंत्रिपदाचे पाहू' असे हसत हसत उत्तर त्यांनी दिले. राजकीय मेगा भरतीला तुम्ही महत्त्व देता की शासकीय मेगा भरतीला, यावर ठाकरे यांनी आपण महाराष्ट्राला महत्त्व देतो असे उत्तर देऊन तरुणांची मने जिंकली. शेतकरी आत्महत्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला. शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नयेत, यासाठी योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी गेला तर आपल्याला जेवण कोण देणार? सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा पडणाऱ्या पावसाचे नियोजन महत्त्वाचे आहे. यातून सह्याद्री पर्वत रांगेत पडणारे पावसाचे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल यासाठी प्रयत्न सुत्त्रू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

तरुणाईला संधीबाबत खंत 
वाहन चालविण्याचा परवाना, मतदानासाठी अठरा वर्षांची अट आहे; पण लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या वयाची अट का नको, असा प्रश्न उपस्थित करून सर्वच राजकीय पक्ष तरुणांच्या मागे पळतात; पण त्यांना संधी देत नाहीत, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Aditya Thackeray's dialogue with youth