सभागृहाचे लॉक तोडून राजा ढालेंनी दिले होते व्याख्यान

अनिलकुमार जमधडे
मंगळवार, 16 जुलै 2019

"आम्ही काही गुंड नाही'' असे म्हणत औरंगाबादमध्ये जाभाऊंनी सभागृहाचे कुलूप तोडून व्याख्यान दिल्याची आठवण रत्नाकर खंडागळे यांनी सांगितली. 

औरंगाबाद -  राजा ढाले यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्याख्यानासाठी बोलावण्यात आले होते. साधारणतः वर्ष 2002-03 चा तो काळ असावा; मात्र अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत राजा ढाले यांच्या व्याख्यानाला सभागृह नाकारण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या राजाभाऊंनी "आम्ही काही गुंड नाही'' असे म्हणत सभागृहाचे कुलूप तोडून व्याख्यान दिल्याची आठवण रत्नाकर खंडागळे यांनी सांगितली. 

आंबेडकरी चळवळीचा झुंजार सेनानी पॅंथर संस्थापक राजाभाऊ ढाले म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. कणखर, बंडखोर असणारा हा पॅंथर तसा मनाने हळवाच होता. कधीही मोठेपणा न बाळगणारा, कार्यकर्त्यांना आपलंसं वाटणारा हा पॅंथर होता. औरंगाबाद शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाले यांना व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून बोलावले होते. श्री. खंडागळे व साहित्यिक प्रदीप म्हसेकर हे ढाले थांबलेल्या भडकलगेटजवळील हॉटेलमध्ये गेले.

त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थीही या ठिकाणी आले होते; मात्र एकाचीही हिंमत होत नव्हती. ढाले यांच्या व्याख्यानाला प्रशासनाने सभागृह नाकारले हे कसे सांगणार, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला होता. अखेर काही विद्यार्थ्यांनी धाडस करून ढाले यांना सभागृह नाकारल्याची माहिती दिली. त्याच क्षणी ""आपण काही गुंड नाही, व्हाईट कॉलर आहोत,'' असे म्हणत विद्यार्थ्यांच्या सोबत जात ढालेंनी कुलूप तोडून व्याख्यान दिले होते. 
  
पुस्तकाचे केले प्रकाशन 
"विचार चळवळीचे बाळासाहेब आंबेडकरांचे' ही पुस्तिका रत्नाकर खंडागळे यांनी संपादन केली; मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नियोजन करूनही कार्यक्रम घेणे होत नव्हते. ढाले औरंगाबादला येणार असे कळाले आणि त्यांच्याशी फोनवरून संपर्क केला. पुस्तक प्रकाशनाची माहिती त्यांना दिली. तेव्हा त्यांनी मी औरंगाबादला येत आहे. विद्यापीठामध्ये कार्यक्रम ठेवला असे सांगत कार्यक्रमात पुस्तकाचे आनंदाने प्रकाशन केले होते. यावेळी आनंद चक्रनारायण, अमरदीप वानखेडे, देवानंद पवार यांचीही उपस्थिती होती, अशी आठवणीही श्री. खंडागळे यांनी सांगितली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about poet Raja Dhale's memories