खेड्यातील या एका मुलीमुळे बदलणार एसएससी बोर्डाचे नियम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

अंजलीच्या बाबतीत जो प्रकार घडला तो भविष्यात इतर कुणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे जुने विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे नियम बदलण्याच्या सूचना शिक्षणमंत्री व संबंधितांना दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. 

औरंगाबाद - अकारण एखाद्या विद्यार्थ्याला केवळ संशयावरून डिबार करणे किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान करणे चूक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जुने नियम केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे दिसतात. अंजलीच्या बाबतीत जो प्रकार घडला तो भविष्यात इतर कुणाच्या बाबतीत घडू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे जुने विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे नियम बदलण्याच्या सूचना शिक्षणमंत्री व संबंधितांना दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. 

दहावीत शिकणाऱ्या अंजली भाऊसाहेब गवळी (रा. पिंपळगाव पांढरी, जि. औरंगाबाद) या विद्यार्थिनीचा राखून ठेवलेला निकाल बोर्डाने जाहीर केला. हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पान फाडल्याचा आरोप करीत एसएससी बोर्डाने तिला डिबार केले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे संबंधित विद्यार्थिनीने दाद मागितल्यावर अखेर बुधवारी (ता. 17) उशिरा बोर्डाने अंजलीचा निकाल जाहीर  केला. त्यासंबंधी गुरुवारी (ता. 18) त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. श्री. बागडे यांनी विद्यार्थिनीचा सत्कार करीत तिला वहीपेन भेट दिले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. बागडे म्हणाले, की बोर्डाच्या पर्यवेक्षकाची चूक असताना त्याची शिक्षा मात्र अंजलीला करण्यात आली होती. आज तिला न्याय मिळाला असला तरी भविष्यात यापुढे अशा चुकीच्या किंवा केवळ संशयाच्या आधारावर विद्यार्थ्यांवर चुकीची कारवाई केली जाऊ नये यासाठी वर्ष 1994 च्या राज्य मंडळाच्या नियमांमध्ये बदल करणे गरजेचे आहे; तसेच याप्रकरणातील दोषींवरही कारवाई होईल, असेही श्री. बागडे म्हणाले. 
  
काय आहे प्रकरण
बोर्डाने अंजलीचा दहावीचा निकाल राखून ठेवला होता. निकाल का राखून ठेवला हे विचारण्यासाठी ती बोर्डाच्या कार्यालयात गेली असता तिला हिंदीच्या उत्तरपत्रिकेतील एक पान फाडल्यामुळे निकाल राखून ठेवल्याचे व दोन वर्षांसाठी डिबार केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेने आपल्या वडीलांसह बोर्डाच्या कार्यालयात धाव घेतली आणि ती उत्तरपत्रिका मी फाडलेली नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तिचे कुणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे तिने शुक्रवारी (ता. पाच) विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपबिती कथन केली. बागडे यांनी तिला आणि तिच्या वडिलांना पुन्हा बोर्डात पाठवले. तरीही त्यांना कुणीच दाद दिली नाही. त्यामुळे बागडे यांनी स्वत: बोर्डाच्या कार्यालयात येत बोर्डाच्या सचिव सुगदा पन्ने यांना अंजलीवर केलेल्या कारवाईबद्दल जाब विचारला. उत्तरपत्रिकेतील पान अंजिलीने फाडले आहे याचा पुरावा तुमच्याकडे आहे का, असे ते सचिवांना म्हणाले. पुरावा
नसताना तिच्यावर कारवाई कशी काय केली. उत्तरपत्रिका जमा करून घेताना पर्यवेक्षकाने तिच्या उत्तरपत्रिकेची पाने बरोबर आहेत की नाही हे का तपासले नाही, पान फाडलेले होते तर पर्यवेक्षकाने उत्तरपत्रिका ताब्यात घेतानाच तिला का रोकले नाही, असे बागडेंनी प्रश्न विचारले. परंतु, बोर्डाच्या सचिव पुन्ने यांनी सुरवातीला आपण या प्रकरणात काहीच करू शकत नाही असे सांगितले होते. 

माझ्याकडे आल्यास मदत करेन 
अंजलीसारखीच औरंगाबाद जिल्ह्यात 58, तर राज्यात सहाशेहून अधिक प्रकरणे असल्याचे श्री. बागडे यांच्या निर्दशनास आणून दिले. अंजलीप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही न्याय मिळवून देणार का? या प्रश्‍नावर माझ्याकडे जो कुणी तक्रार घेऊन येईल त्या प्रत्येकाला मदत करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about SSC board rules