विस्थापित शिक्षकांना पदस्थापनेची हवी एक संधी

संदीप लांडगे  
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

जून 2019 मध्ये झालेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये वीसपैकी एकही पर्याय न मिळाल्याने विस्थापित झालेल्या शिक्षकांना "पवित्र पोर्टल'नुसार होत असलेल्या नवीन शिक्षक भरतीदरम्यान पदस्थापनेची एक संधी देण्याची मागणी एकल महिला शिक्षिकांसह संघटनांनी केली आहे. 70 ते 100 किलोमीटर दूरवर फेकल्या गेलेल्या या महिला शिक्षिकांचे संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ही संधी गरजेची असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद : जून 2019 मध्ये झालेल्या ऑनलाइन बदल्यांमध्ये वीसपैकी एकही पर्याय न मिळाल्याने विस्थापित झालेल्या शिक्षकांना "पवित्र पोर्टल'नुसार होत असलेल्या नवीन शिक्षक भरतीदरम्यान पदस्थापनेची एक संधी देण्याची मागणी एकल महिला शिक्षिकांसह संघटनांनी केली आहे. 70 ते 100 किलोमीटर दूरवर फेकल्या गेलेल्या या महिला शिक्षिकांचे संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ही संधी गरजेची असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. 

यंदा ऑनलाइन बदल्यांना उशीर झाला. या प्रक्रियेत वीस गावांचे पर्याय द्यायचे होते. यात ज्यांना कुणीही वाली नाही, अशा एकल महिला शिक्षिकांना एकही गाव मिळाले नाही. त्यामुळे त्यांना विस्थापितांच्या यादीत टाकण्यात आले. त्यानंतर शिक्षण विभागाने समुपदेशन प्रक्रिया राबविली खरी; परंतु यासाठी जाहीर केलेली सर्वच गावे ही अति दूरवरील कन्नड, सोयगाव आणि वैजापूर तालुक्‍यांतीलच होती. महिला शिक्षिकांच्या दृष्टीने 90 टक्के गावे गैरसोयीची होती; परंतु नाइलाजाने यातील एका गावाची निवड महिला शिक्षिकांना करावी लागली. आता कर्तव्य बजावताना या महिलांची अक्षरशः दमछाक होत आहे. 

सुदैवाने यंदा नवीन शिक्षक भरती होत आहे. नवीन शिक्षक जिल्ह्यात कुठेही जाऊन नोकरीस तयार असतात. त्यामुळे या भरतीसाठी असलेल्या समानीकरणातील जागा, रिक्त असलेल्या जागांवर विस्थापित शिक्षकांना पदस्थापनेची एक संधी देण्याची मागणी महिला शिक्षिकांमधून होत आहे. शिक्षक संघटनांनीही ही मागणी लावून धरली आहे. 

कौटुंबिक आयुष्य होतेय उद्‌ध्वस्त 
यंदाच्या समुपदेशनातील जवळपास सर्वच गावे दूरवरील होती. उदा ः वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यातील नाशिकला लागून असलेल्या केंद्रातील गावे किंवा सोयगावातील जरंडीपलीकडील गावेही महिला शिक्षिकांना नाइलाजाने घ्यावी लागली. यातील शिक्षिकांना रोज 70 ते 80 किलोमीटर शाळेच्या गावाला जाणे-येणे करावे लागते. रोज तब्बल दीडशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय त्यांना विविध आजारांचाही सामना करावा लागणार आहे. 
 

एकल महिला शिक्षिकांचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनलेला आहे. त्या संवर्ग चारमध्ये येत असल्याने आपल्याला कुणीच वाली नसल्याची या शिक्षिकांची भावना झालेली आहे. अशा महिला शिक्षिका एवढा प्रवास करून, अतिदूरच्या गावातील शाळेत जाऊन मन लावून कसे शिकवणार? आता नवीन शिक्षक भरतीदरम्यान या महिलांचा प्राधान्याने विचार करावा; तसेच विस्थापित पुरुष शिक्षकांनाही न्याय द्यावा. आमची संघटना याचा नक्कीच पाठपुरावा करणार आहे. 
- विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about zp teachers