प्रचार साहित्याला नोटाबंदीचा तडाखा 

शेखलाल शेख 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - पक्ष असो की अपक्ष, उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह आलेच. निवडणूक चिन्ह मतदारांत बिंबविण्यासह आपली भूमिका मांडण्यासाठी प्रचार महत्त्वाचा. त्यासाठी कार्यकर्ते सज्ज असतातच. त्यानुसार पक्षांचे कार्यकर्ते गळ्यात रुमाल, डोक्‍यावर टोपी; तसेच खिशाला पक्षाच्या चिन्हाचे बॅज लावून फिरू लागले आहेत. गावोगावी कार्यकर्ते प्रचार करत असले तरी नोटाबंदीचा अनेक उमेदवारांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रचार साहित्याची विक्री घटली आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत मराठवाड्यात प्रचार साहित्याची खरेदी अर्ध्यावर आली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, हेही त्यामागचे कारण आहे.

औरंगाबाद - पक्ष असो की अपक्ष, उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह आलेच. निवडणूक चिन्ह मतदारांत बिंबविण्यासह आपली भूमिका मांडण्यासाठी प्रचार महत्त्वाचा. त्यासाठी कार्यकर्ते सज्ज असतातच. त्यानुसार पक्षांचे कार्यकर्ते गळ्यात रुमाल, डोक्‍यावर टोपी; तसेच खिशाला पक्षाच्या चिन्हाचे बॅज लावून फिरू लागले आहेत. गावोगावी कार्यकर्ते प्रचार करत असले तरी नोटाबंदीचा अनेक उमेदवारांना फटका बसला आहे. त्यामुळे प्रचार साहित्याची विक्री घटली आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत मराठवाड्यात प्रचार साहित्याची खरेदी अर्ध्यावर आली आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, हेही त्यामागचे कारण आहे. सोशल मीडियाद्वारे कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येत असल्याने अनेक उमेदवार त्याचा वापर करीत आहेत. 

गळ्यात रुमाल, डोक्‍यावर टोपी, हातात झेंडा घेऊन आपापल्या पक्षांचा जयघोष करीत प्रचार करणारे कार्यकर्ते गावागावांत दिसत आहेत. काही जणांनी प्रचारास दणक्‍यात सुरवात केली असली तरी बहुतांश उमेदवारांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. रोख रकमेची अडचण असल्याने सध्या त्यांनी मोजकीच प्रचार साहित्याची खरेदी केली आहे. जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत 15 ते 20 हजारांपर्यंत प्रचार साहित्य खरेदी करणारा उमेदवार सध्या पाच हजारांच्या आतच खरेदी करताना दिसतो. सद्यःस्थितीत प्रचार साहित्य खरेदीमध्ये जिल्ह्यात शिवसेना, कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

गरजेपुरतीच साहित्य खरेदी 
जिल्हा परिषदेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात जवळपास आठ कोटींच्या प्रचार साहित्याची विक्री झाल्याचा अंदाज होता. सध्या मराठवाड्यात निवडणूक प्रचारासाठी लागणारे झेंडे, टोपी, रुमाल, प्लास्टिक बॅचेस, पताका, टीशर्ट, स्टिकर, मेटल बॅचेसची विक्री अर्ध्यावर राहण्याची शक्‍यता आहे. सध्या सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी कॉंग्रेस, शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेल्या प्रचार साहित्याला सर्वाधिक मागणी आहे. त्याखालोखाल भाजप, राष्ट्रवादी, इतर पक्ष, अपक्षांची चिन्हे असलेले प्रचार साहित्य विक्री होत आहे. मागील निवडणुकीच्या वेळेस एका उमेवारासाठी एका गटात जवळपास 10 ते 20 हजार रुपयांपेक्षा जास्त प्रचार साहित्य लागले होते. तर काही मातब्बर उमेदवारांची साहित्य खरेदी लाखोंच्या घरात होती. यंदा हा खर्च काही हजारांवर आल्याचे चित्र आहे. 

रुमालास सर्वाधिक मागणी 
सध्या विविध पक्षांच्या उमेदवारांकडून रुमाल, प्लास्टिक बॅचेसची सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय टोप्या, बिल्ले, पक्षीय झेंड्यांनाही मागणी आहे. सद्यःस्थितीत कार्यकर्त्यांना गळ्यात टाकण्यासाठीच्या रुमालांची खरेदी सर्वाधिक दिसते. आचारसंहिता कडक असल्याने फक्त परवानगी घेतलेल्या वाहनांवर झेंडे लावता येत आहेत. त्यामुळे झेंड्यांची विक्री कमी झालेली आहे. काही सधन उमेदवार प्रचार साहित्याबरोबर टीशर्टसुद्धा खरेदी करताना दिसतात. 

मतदारांच्या गाठीभेटींवर जोर 
प्रचार साहित्य खरेदीचा कल सध्या बदलला असून साहित्यामध्ये जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा उमेदवारांचा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर जोर आहे. प्रचार साहित्य देण्याऐवजी स्वतःची माहिती, केलेली विकासकामे, निवडून आल्यावर काय करणार याची माहिती असलेली पत्रके छापून ती मतदारांना दिली जात आहेत. 

सोशल मीडियाची चलती 
अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. उमेदवारांसोबत त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यकर्ते हे सोशल मीडियावर आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात.

Web Title: Notes to ban smacking promotion materials