Vidhansabha Election 2019 आंबेडकरांना आरएसएसची फूस आहे का ? इम्तियाज जलील

अनिल जमधडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा वंचितने योग्य निर्णय घ्यावा 

औरंगाबाद - "वंचित बहुजन आघाडीची एमआयएमशी कुठलीही बोलणी सुरू नाही. कुणाशी बोलणी सुरू आहे, ते स्पष्ट करा. राज्यात वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीला सुवर्ण संधी आहे. अजूनही वेळ गेली नाही, अशावेळी एमआयएमला झुलवत ठेवण्यापेक्षा योग्य निर्णय घ्या'', अशी हात जोडून विनंती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पत्रकार परिषदेत केली. सध्याची परिस्थिती बघता आंबेडकरांना आरएसएसची फूस आहे का? अशी शंका येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

एमआयएम सोबतच्या आघाडीची बोलणी आम्ही पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांच्याशीच करू, इम्तियाज जलील यांना ते अधिकार नाहीत असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजूनही आमची युती कायम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता. नऊ) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 

खासदार इम्तियाज म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस संपल्यात जमा आहेत. अशावेळी एमआयएमला आठ जागा देऊ असे सांगत वंचित आम्हाला का झुलवत ठेवत आहे. विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आपल्या जागांची यादी द्यावी हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी सांगितले तेव्हा आम्ही त्यांना 98 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यांनी तो कमी करून पाठवण्यास सांगितले तेव्हा तो 74 जागांवर आणला; परंतु त्यानंतर त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. ओवेसी आंबेडकरांच्या बैठकीतही त्यात तोडगा निघाला नाही. विधानसभा निवडणुकांची तयारी करायला पुरेसा वेळ देता यावा, म्हणून ज्या जागा देणार आहत, त्या आम्हाला सांगा अशी आमची मागणी होती; पण आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही, ओवेसी यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे, असे सांगत वंचितच्या प्रवक्‍त्यांनी पत्रके काढत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ओवेसींनी वंचितकडे 17 जागांची यादी दिली होती, हा शोध कुणी लावला असा प्रश्‍नही इम्तियाज यांनी यावेळी केला. मंगळवारी (ता. दहा) माळेगाव, वडगाव शेरी व नांदेड विधासभेसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
  
आजपासून एमआयमच्या मुलाखती 
प्रकाश आंबेडकर यांचा माझ्यावर राग का आहे? हे माहित नाही; पण मी जे पत्रक काढले ते ओवेसी यांच्या परवानगीनेच काढले होते. ती आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच खासदार इम्तियाज म्हणाले, ""ओवेसी हे माझे गॉडफादर आहेत. त्यांनी सांगितले तर दोन मिनिटांत प्रदेशाध्यक्ष पदाचा व खासदारकीचा राजीनामा देईल'', अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. यावेळी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, शहराध्यक्ष समीर अब्दुल साजेद, मनपाचे गटनेते गंगाधर ढगे यांची उपस्थिती होती. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press conference of MP Imtiaz Jalil about Wanchit Bahun Aaghadi