Vidhansabha 2019 : प्रकाश आंबेडकरांचं ठरलं! 'वंचित' लढवणार 288 जागा

योगेश पायघन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

आतून-बाहेरून कोणताही पाठिंबा नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर  

औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढविणार असल्याचा निर्णय झाला आहे. कुणालाही आतून किंवा बाहेरून पाठिंबा देणार नाही. माझ्यावर 40 वर्षांपासून आरोप सुरू असून मला त्याची पर्वा नाही. भान ठेवून टीका केली तर त्याला वजन राहते, असा अप्रत्यक्ष टोला वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या नेत्यांना लगावला. तसेच वंचितसोबत अनेक मुस्लिम संघटना असल्याचाही दावा त्यांनी केला. 

जालना येथील मेळाव्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. 13) औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की अलुतेदार बलुतेदारांची 18 टक्के लोकसंख्या असून बदलत्या आर्थीक क्रांतीत त्यांचा नायनाट झाला. सत्तेत आलो तर जातनिहाय जनगणना करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण राबवू. शंभर ते पाचशे कोटींची मालमत्ता असणाऱ्या 35 हजार कुटुंबांनी गेल्या शंभर दिवसांत कायमस्वरुपी देश सोडला. भयभीत व्यापारी निवृत्तीची भाषा बोलू लागले. अशात विरोधी पक्ष मजबुत असण्याची गरज आहे. पक्षांतरात नेते संपले मात्र कार्यकर्ता संपलेला नाही. विरोधी पक्षाला एकीचे बळ दिले तरच "वन नेशन वन पार्टीचे' स्वप्न पाहणाऱ्यांना सरळ करता येईल. ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मौलवी उस्मान रहेमान शेख, नायाब अन्सारी यांच्या चर्चा झाली. त्यांनी वंचितला पाठिंबा दिला आहे. अनेक मुस्लीम संघटना सोबत आहेत. वामनराव चटप यांची शेतकरी संघटना, सीपीआय-सीपीएमचा गट, सत्यशोधक पार्टी सोबत येण्याच्या तयारीत आहे, असेही ऍड. आंबेडकर यांनी सांगितले. अमित भुईगळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
  
जवळ असलेल्या ठेवी जपून वापरा 
विदर्भात पूरग्रस्त भागात मदत मिळेनाशी झाली आहे. राज्य सरकार माणुसकी हीन बनले असतांना एनजीओंनी मदतकार्य सुरु ठेवावे. देशात सात-आठ वर्ष मंदी हटणार नाही. निवृत्त बॅंक अधिकाऱ्यांनी ठेविदारांची संघटना स्थापन करुन ठेवी सुरक्षित असल्याची खात्री करा. जवळ असलेल्या ठेवी जपुन वापरा, असे आवाहनही ऍड. आंबेडकर यांनी केले. 

  • लोकसभेत आम्ही युती धर्म पाळला 
  • एमआयएम सोडून गेले आम्ही नाही 
  • वंचित 25 मुस्लीम उमेदवार देणार 
  • वंचितमध्ये ओबीसी, जैन, मारवाडी, मराठा समाजाचाही समावेश 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press Conference of Prakash Ambedkar