एसटीच्या विभागीय कार्यशाळा उरल्या फक्‍त डागडुजीपुरत्याच! 

प्रकाश बनकर : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

औरंगबाद - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील विभागीय कार्यशाळांत होणारी बसबांधणी प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. या कार्यशाळेत केवळ बसगाड्या दुरुस्ती आणि डागडुजीची कामे करण्यात येत आहेत. नव्या बसगाड्यांच्या बांधणीचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. चालू महिन्यापासून खासगी कंपन्यांकडून कामे करण्यात येणार आहेत. यामुळे दोन हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. 

औरंगबाद - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील विभागीय कार्यशाळांत होणारी बसबांधणी प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. या कार्यशाळेत केवळ बसगाड्या दुरुस्ती आणि डागडुजीची कामे करण्यात येत आहेत. नव्या बसगाड्यांच्या बांधणीचे काम खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. चालू महिन्यापासून खासगी कंपन्यांकडून कामे करण्यात येणार आहेत. यामुळे दोन हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. 

एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा (औरंगाबाद), दापोडी (पुणे) आणि हिंगणा (नागपूर) येथे विभागीय कार्यशाळा आहेत. या तिन्हा कार्यशाळेत वर्षाकाठी 1800 बसगाड्यांची बांधणी करण्यात येते. चेसीजची खरेदी करून या तिन्ही कार्यशाळेत बसगाड्यांची बांधणी करण्यात येते. लाल डबा, हिरकणी यासह विविध बसगाड्यांची येथेच बांधणी होते. ही बांधणीची प्रक्रिया ऑक्‍टोबरपासून थांबविण्यात आली आहे. त्याजागी आता नादुरुस्त बसगाड्यांच्या डागडुजीची कामे करण्याची वेळ कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांवर आली आहे. स्पर्धेच्या काळात एसटीही कात टाकत आहे. यामुळे शिवनेरी, स्कॅनिया, अश्‍वमेध यासारख्या वातानकूलित बसगाड्या चालविण्यात येत आहेत. मात्र एसटीचा खरा प्रवासी हा लाल डबा आणि हिरकणीने प्रवास करणारा आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या बसगाड्यांची संख्या वाढविणे सोडून शिवनेरी, स्कॅनिया आणि अश्‍वमेश अशा महागड्या बसगाड्या चालवून महामंडळ तोट्यात टाकण्याचेही काम सुरू आहे. प्रादेशिक कार्यालयाबरोबर विभागीय कार्यशाळाही बंद करण्याच्या हालचाली एसटीतर्फे सुरू आहेत. यामुळे जून 2016 दरम्यान खाजगी कंपन्याकडून बस बांधणीसाठी टेंडर मागविण्यात आले होते. यासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला; मात्र तांत्रिक अडचणींमुळे हे टेंडर पास होण्यास अडचणी आल्या. मात्र या अडचणी दूर झाल्या असून लवकरच खासगी कंपनीकडून बस बांधणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी "सकाळ'ला दिली. 

कमी खर्चात दर्जेदार बस बांधणी व्हावी यासाठी एस. टी. महामंडळाची स्थापना झाल्यापासून पुण्यातील दापोडी येथे विभागीय कार्यशाळा सुरू करण्यात आली. त्यापाठोपाठ 1977 मध्ये चिकलठाणा, तर 1980 मध्ये हिंगणा विभागीय कार्यशाळा सुरू करण्यात आली. तिन्ही कार्यशाळेतून महिन्याकाठी 150 बसगाड्यांची बांधणी करण्यात येते. आता खासगी कंपन्यांकडून शीतल, हिरकणी, पूर्णपणे वातानुकूलित बसगाड्यांची बांधणी होणार आहे. 

कार्यशाळांवर एक दृष्टिक्षेप 

- चिकलठाण्यात महिन्याकाठी 50 बसगाड्या बांधणी 

- दापोडी कार्यशाळेत 75 गाड्यांची बांधणी 

- हिंगणा येथे 25 बसगाड्यांची बांधणी होते. 

- तिन्ही कार्यशाळेत दोन हजारहून अधिक कर्मचारी कामगार

Web Title: Regional workshops ST remains the only repair

टॅग्स