आरटीई प्रवेश लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर 

संदीप लांडगे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा
राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. 

औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा
राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. 

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार दुर्बल, वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान दोन टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे.  या कायद्यानुसार प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार 195 शाळांमध्ये एक लाख 16 हजार 934 जागांसाठी दोन लाख 46 हजार 86 अर्ज दाखल झाले आहेत. तर मराठवाड्यातील एकूण एक  हजार नऊशे 27 शाळांमध्ये वीस हजार 726 प्रवेशाच्या जागा उपलब्ध असून, त्यासाठी 44 हजार 544 अर्ज दाखल झाले आहेत. 

प्रवेशासाठी राज्यातून दोन लाख 46 हजार 86 अर्ज दाखल झाले असले तरी फक्त एक लाख 16 हजार 934 विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातर्फे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना यंदा मोफत प्रवेश मिळू शकणार नाही. प्रवेशासाठी यंदा तीनच लॉटरी टप्प्याटप्प्याने काढल्या जाणार आहेत; पण पहिल्या लॉटरीची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. यंदा जिल्हास्तराऐवजी राज्यस्तरावर लकी ड्रॉ काढला जाणार असून, सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे. सोमवारपर्यंत ड्रॉ विषयीची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली. 

मागच्या वर्षी 13 मार्चला 
मागील वर्षी तर 13 मार्चलाच ड्रॉ झाला होता. यंदा विलंब का? अशी चर्चा पालकांमध्ये होते आहे; मात्र अद्याप लकी ड्रॉची तारीख जाहीर न झाल्याने पालकांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE process at state level