महाजनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्र्यांनी रणगाडाच वापरावा : सचिन सावंत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

राज्यातील रस्त्यांवर एवढे खड्डे आहेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रेसाठी रथाचा वापर केल्यास स्पॉंडिलायसीसचा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी रणगाड्याचा वापर करावा, प्रकृतीसाठी चांगले राहील, असा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (ता. 30) लगावला. 

औरंगाबाद - राज्यातील रस्त्यांवर एवढे खड्डे आहेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रेसाठी रथाचा वापर केल्यास स्पॉंडिलायसीसचा आजार होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी रणगाड्याचा वापर करावा, प्रकृतीसाठी चांगले राहील, असा टोला कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (ता. 30) लगावला. 

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी गांधी भवनात घेण्यात आल्या. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना श्री. सावंत म्हणाले, की निवडणुकीच्या तोंडावर युतीला जनतेची आठवण झाली. त्यामुळे आता यात्रा सुरू झाल्या आहेत. मात्र राज्यातील अनेक भागात अद्याप दुष्काळ संपलेला नाही. मुख्यमंत्री मते मागण्यासाठी जात आहेत. मात्र, साडेचार वर्षात काहीच काम केले नसल्याने मुख्यमंत्री ताठ मानेने जनतेसमोर जाऊ शकणार नाहीत आणि पाकिस्तानवरील हल्ला, राष्ट्रवादाचा विषय त्यांच्या मदतीसाठी येणार नाही. कॉंग्रेससोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही सावंत यांनी केला. 
  
कॉंग्रेसमुक्त भारत नव्हे, कॉंग्रेसयुक्त भाजप 
भाजपचे निर्लज्जपणाचे राजकारण सुरू असून, धाकदडपशाही, इडीमार्फत चौकशीची धमकी देत इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला. कॉंग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने आता कॉंग्रेसयुक्त भाजप केला आहे. त्यांना कार्यकर्ते तयार करता आले नाहीत, हे दुर्दैव आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा बुरखा फाटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेससोबत यावे, असे आवाहनही सावंत यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Sawant's reaction on Mahajanadesh Yatra