Vidhansabha 2019 : संभाजी ब्रिगेडची युतीसह आघाडी, वंचितसोबत बोलणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

विधानसभेसाठी 15 उमेदवारांची यादी जाहीर 

औरंगाबाद - तब्बल 25 वर्षे दुसऱ्यांसाठी लढलो, आता स्वतःसाठी आणि तेही जिंकण्यासाठी आम्ही आगामी विधानसभा निवडणुका लढणार आहेत, असे स्पष्ट करीत संभाजी ब्रिगेडने पहिल्या 15 उमेदवारांच्या नावांची यादी शुक्रवारी (ता.23) जाहीर केली. आघाडी, युतीसह वंचित बहुजन आघाडीसोबतही आमचे बोलणे सुरू असून सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वतंत्र निवडणुका लढवू, असे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी घोषित करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भानुसे म्हणाले, की राज्यभर संपर्कप्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिलो. मात्र, आता नाही. संभाजी ब्रिगेडच्या संसदीय समितीची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यालयात पार पडली. यामध्ये ब्रिगेडने विधानसभेसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले. सर्वच पक्षांबरोबर संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ नेते चर्चा करीत आहेत. सन्मानजनक जागा मिळाल्या तर ठीक अन्यथा, स्वबळावर लढणार किंबहुना विविध समविचारी घटकांना एकत्र घेऊन तिसरी आघाडी निर्माण करू. संभाजी ब्रिगेडला निवडणूक आयोगाकडून "शिलाई मशीन' अधिकृत चिन्ह मिळाले आहे. आमचा राजकीय अजेंडा ठरलेला आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन विधानसभा निवडणूक मैदानात उतरणार आहोत. पत्रकार परिषदेस प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे, राजेंद्र पाटील उपस्थित होते. 

यावेळी जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माणिकराव महादेव पावडे, कारंजा (जि. वाशीम), आशीष नरसिंगराव खंडागळे, आर्वी (वर्धा), राजू ऊर्फ नितीन पुंडलिकराव वानखेडे देवळी (वर्धा), दिलीप किसनराव मडावी, गडचिरोली (गडचिरोली), जगदीश नंदुजी पिलारे, ब्रह्मपुरी, (चंद्रपूर), अरुण नामदेवराव कापडे, वरोरा (चंद्रपूर), भगवान भीमराव कदम, भोकर, धनंजय उत्तमराव सूर्यवंशी, नांदेड उत्तर, (नांदेड), बालाजी माधवराव शिंदे, जिंतूर, (परभणी), टिळक गोपीनाथराव भोस श्रीगोंदा (नगर), डॉ. संदीप माणिकराव तांबारे, उस्मानाबाद (उस्मानाबाद), दिनेश गोपीनाथराव जगदाळे, म्हाडा (सोलापूर), सोमनाथ विजय राऊत, सोलापूर उत्तर (सोलापूर), किरण शंकरराव घाडगे, पंढरपूर (सोलापूर), ऋतुराज जयसिंगराव पवार, तासगाव कवठेमहाकाळ (सांगली) यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade list of 15 candidates released