मुख्यमंत्र्यांच्या 'बरखास्तीच्या' इशाऱ्याला शिवसेनेचे कचऱ्याने उत्तर 

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 19 जुलै 2018

औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. यामुळे बुधवारी (ता.18) मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा, अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा देताच संतापलेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी (ता.19) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच दोन ट्रक कचरा टाकून मुख्यमंत्र्यांना जोरदार उत्तर दिले आहे. यामुळे पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. शिवाय, परिसरात दुर्गंधी पसरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल बांधूनच काम करावे लागले. 

औरंगाबाद महापालिकेवर शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. मात्र, हा प्रश्‍न मार्गी लावण्याऐवजी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर चिकलफेक करीत राजकारण करीत असल्याचा नागरिकांचा आरोप होत आहे. याप्रश्‍नी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जबाबदार धरले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी कचरा कोंडीला खासदार खैरे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. दरम्यान, बुधवारी (ता.18) नागपूर विधानभवनात मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्‍तांसह भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यात हा प्रश्‍न तातडीने मार्गी न लागल्यास महापालिका बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. हा इशारा जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी कचऱ्याने भरलेला एक ट्रक, एक टॅक्‍टर सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारातच हा कचरा टाकत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. काही वेळानी दंगाकाबू पथकासह पोलिस दाखल झाले. मात्र, तोपर्यंत कचरा टाकून झाला होता. तसेच यामुळे दुर्गंधी पसरल्याने नाका-तोंडावर रुमाल बांधूनच फिरावे लागले. 

महपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी कचरा प्रश्‍न मार्गी लावणे हे प्रशासनाचे काम आहे. काही दिवसापूर्वी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसेकर यांनी येथे भेट देऊन दहा दिवसात कचरा कोंडी फोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आजतागायत प्रशासनाने वेळकाढूपणा दाखविला. त्यामुळे जनतेच्या प्रश्‍नांवर आम्ही शांत बसणार नाही. तातडीने हा प्रश्‍न मार्गी न लागल्यास आणखी कचरा आणून टाकू. 

- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Shiv Sena's trash answer to CM's 'dismissal' remark