Election analysis : कॉंग्रेसला मतफुटीचे ग्रहण, राष्ट्रवादी-एमआयएम शिवसेनेच्या बाजूने

माधव इतबारे
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यात सरळ लढत होती. यात श्री. दानवे विजयी झाले.

औरंगाबाद - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्याचा जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महाआघाडीचे बाबूराव कुलकर्णी यांना केवळ 106 मते पडली. कॉंग्रेसचा करिष्मा कमी झाल्यानेच महायुतीचे अंबादास दानवे मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले. विशेष म्हणजे एकमेकांच्या विरोधात आक्रमकपणे राजकारण करणाऱ्या एमआयएम पक्षाने शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याचेही दानवे यांना मिळालेल्या 524 मतांच्या आकड्यांवरून समोर आले आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी व शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्यात सरळ लढत होती. दोन्ही तगडे उमेदवार असल्याने काट्याची टक्कर होईल, असा मतदारांचा अंदाज होता. मात्र, शिवसेनेचे राजू वैद्य यांच्या निवासस्थानी दानवे आणि कुलकर्णी यांनी एकत्र येत निवडणुकीत घोडेबाजार न करण्याचा संकल्प केला व निवडणुकीतील चुरस संपली. त्यानंतर निवडणुकीचा निकालही एकतर्फीच लागला. दरम्यान, कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार यांनीही शिवसेनेची बाजू घेतल्यामुळे "मालक' बॅकफूटवर गेले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत होती, तशी आघाडीच्या सदस्यांची चलबिचल वाढली होती. शेवटच्या दोन दिवस आधी बाबूराव कुलकर्णी यांनी स्वपक्षातील सदस्यांशी संपर्क साधला; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सत्तार आणि दानवे यांच्या थेट संपर्कातून आघाडीची निम्मी मते महायुतीकडे वळविण्यात या जोडीला यश आले होते. त्यामुळे श्री. दानवे यांना 524, श्री. कुलकर्णी यांना 106, अपक्ष शहानवाज खान यांना केवळ तीन मते मिळाली, तर 14 मते बाद ठरली. वैध 633 मतांमधून विजयासाठी 317 मतांचा कोटा होता. दानवे यांनी पहिल्या पसंतीतच तो पूर्ण करीत पाच फेऱ्यांमध्ये 524 मते मिळवली. वास्तविक महायुतीकडे 333 तर महाआघाडीकडे 250 मते होती. 
 
भाजपचे बंड थंड 
जालना आणि औरंगाबाद जिल्हा परिषदेतील युतीचे कारण पुढे करीत भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना बंडाचे स्वरूप येण्याआधीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांनी थंड केले. तर दुसरीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, अनिल देसाई यांनी सदस्यांना वेळोवेळी दिलेला "कानमंत्र' कामाला आला. 
  
एमआयएमने वाढविले मताधिक्‍य 
एमआयएम, कॉंग्रेस-आघाडी व अपक्षांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून योग्य "नियोजन' करण्यात आले होते. त्यामुळे सदस्यांनीदेखील आनंदाने आपले मत महायुतीच्या पारड्यात टाकले. त्यामुळे शिवसेनेचे मताधिक्‍य वाढल्याची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan parishad election analysis