Vidhan Sabha Election 2019 : ज्या शहरातून आघाडी त्याच शहरातून झाली बिघाडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीने ज्या औरंगाबाद शहरात संयुक्त सभा घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना धडकी भरविली होती त्याच औरंगाबाद शहरातून वंचित आणि एमआयएमची आघाडी तुटल्याची घोषणा झाली. लोकसभेनंतर विधानसभेतसुद्धा हे दोन्ही पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडवतील, अशी शक्‍यता असताना दोन्ही पक्षांनी वेगळ्या वाट्या धरल्या. त्यामुळे निवडणुकीतील एमआयएमचे विजयाचे गणित बिघडले आहे. 

औरंगाबादेत एमआयएमला दलितांची भरभरून मते मिळाली होती. ती आता मिळतील का, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभेच्या आकडेवारीवरून सहज विजयाचे दावे केले जात असताना एमआयएमला आता त्यांच्याच गडातील औरंगाबाद मध्य आणि पूर्वमध्ये संघर्ष करावा लागेल. 

इतकेच नव्हे, तर इतर मतदारसंघांतसुद्धा दलित-ओबीसी मतांशिवाय एमआयएमची वाट बिकट राहील. वंचित आघाडीने एमआयएमला मालेगाव (मध्य), जळगाव, हिंगोली, औरंगाबाद (पूर्व), सोलापूर मध्य, भायखळा, चांदीवली आणि उदगीर अशा आठच जागा देऊ केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एमआयएमने वेगळी वाट धरली. लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमच्या आघाडीचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला किमान आठ जागांवर फटका बसला होता. इतर जागांवर त्यांनी चाळीस लाखांच्या पुढे मते घेतली होती. यानंतर वंचितने जवळपास 288 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे एमआयएमला किती जागा मिळतील, यावर चर्चा सुरू होती. ऍड. प्रकाश आंबेडकर आणि अससुद्दीन ओवेसी यांच्या बैठका होऊनसुद्धा तोडगा निघाला नाही. वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएने 24 मतदारसंघांत निवडणूक लढविली. तेवढ्या जागासुद्धा त्यांना वंचित देण्यास तयार झाली नाही. इतकेच नव्हे, तर औरंगाबाद मध्यमध्ये विद्यमान आमदार असताना त्यावर वंचितने दावा केला होता. त्यामुळे एमआयएमने स्वतंत्र लढण्याची वाट निवडली आहे. आता दोन्ही पक्ष वेगळे झाल्याने दोघांच्या मतांची विभागणी होणार असल्याने याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्‍यता आहे. 
 
आता बहुरंगी लढतीची शक्‍यता 
हैदराबादनंतर एमआयएमची सर्वाधिक शक्ती ही औरंगाबादेत आहे. आता मध्य आणि पूर्व या सहज विजयी होतील अशा जागांवर मतविभागणीचा जबरदस्त फटका एमआयएमला बसण्याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यमध्ये इम्तियाज जलील यांना 99,450, तर पूर्वमध्ये 92,347 मते मिळाली होती. या दोन मतदारसंघांत एमआयएमला आघाडी होती; मात्र आता येथे वंचितचा उमेदवार राहिल्यास एमआयएमला विजयासाठी संघर्ष करावा लागेल. त्यासोबत एमआयएमला कन्नडमधून 34,263, औरंगबाद पश्‍चिम 71,239, गंगापूर 56,023, तर वैजापूरमधून 35 हजार 462 मते मिळाली होती. आता या सर्वच मतदारसंघांतील मतांचे गणित बदलले आहे. भाजप-शिवसेना युती झाली तर युती, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, वंचित आणि एमआयएम आणि इतर पक्षांचे उमेदवार अशी बहुरंगी लढत औरंगाबाद जिल्ह्यातील मतदारसंघांत होण्याची शक्‍यता राहील. 
 
एमआयएमकडे 125 मतदारसंघांत 350 इच्छुक 

मागील विधानसभा निवडणुकीत ज्या 24 दलित-मुस्लिम-ओबीसीबहुल जागांवर एमआयएमने उमेदवार दिले होते त्या जागांशिवाय एमआयएमकडे आता राज्यातील 125 दलित-मुस्लिम-ओबीसीबहुल जागांवर जवळपास 350 इच्छुकांनी अर्ज केलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुक हे औरंगाबाद मध्यमधून असल्याची माहिती एमआयएमच्या सूत्रांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com