बैल, बारदाना मोडला... पेरणीला ट्रॅक्‍टरसाठी प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

उस्मानाबाद - दिवाळी सण झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता रब्बी पेरणीसाठी धावपळ सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे बैल-बारदाना नसल्यामुळे ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी करून घेण्याकडे कल असला तरी वेळेत ट्रॅक्‍टर उपलब्ध होत नसल्यामुळे पेरणीला काही ठिकाणी विलंब होत असल्याचे चित्र आहे. 

उस्मानाबाद - दिवाळी सण झाल्यामुळे शेतकऱ्यांची आता रब्बी पेरणीसाठी धावपळ सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांकडे बैल-बारदाना नसल्यामुळे ट्रॅक्‍टरद्वारे पेरणी करून घेण्याकडे कल असला तरी वेळेत ट्रॅक्‍टर उपलब्ध होत नसल्यामुळे पेरणीला काही ठिकाणी विलंब होत असल्याचे चित्र आहे. 

यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिकांच्या काढणीला विलंब झाला. दिवाळी सणापूर्वी अनेकांनी जमिनीतील वाफसा झाल्यानंतर खरीप पिकांची काढणी केली; मात्र रब्बीच्या पेरणीला विलंब झाला. आता दिवाळी सण संपल्यामुळे शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी धावपळ करीत आहेत. स्वतःकडे बैल बारदाना असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी उरकली आहे. काही शेतकरी सध्याही पेरणीमध्ये व्यस्त आहेत. अनेकांना ट्रॅक्‍टरवरच विसंबून राहावे लागत आहे. सणासुदीचे दिवस संपल्याने एकाचवेळी एका ट्रॅक्‍टरचालकांच्या मागे आठ ते दहा शेतकऱ्यांचा तगादा सुरू आहे. पेरणी करून घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त व ट्रॅक्‍टरची संख्या कमी असल्यामुळे पेरणीला काही ठिकाणी विलंब होत आहे. काही शेतकरी ट्रॅक्‍टरचालकांना ऍडव्हॉन्स रक्कम देऊन पेरणीचा दिवस निश्‍चित करीत आहेत. तरीही वेळेत ट्रॅक्‍टर शेतावर येण्याची खात्री नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

जमिनीतील ओलावा अद्यापही टिकून आहे. त्यामुळे हा ओलावा संपण्यापूर्वीच पेरणी करणे गरजेचे असल्याने शेतकरी धावपळ करीत आहेत. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती. आता सोयाबीनची काढणी झाल्यामुळे याच रानात शेतकरी रब्बी हंगामातील पेरणी करीत आहेत. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्रही वाढणार आहे. हरभरा, ज्वारीच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल आहे. याशिवाय काही शेतकरी करडईचीही पेरणी करीत आहेत. 

Web Title: wait for sowing tractor