अशोक चव्हाण विजयी होणार का? (Video)

दयानंद माने
Wednesday, 23 October 2019

भोकर मतदारसंघातून अशोकरावांचे वडील (कै.) शंकरराव चव्हाण यांनी, तसेच गोरठेकरांचे वडीव (कै.) बाबासाहेब गोरठेकर यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. हे दोघेही 1978 च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे होते. आता तब्बल 40 वर्षांनी त्यांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

नांदेड : कॉंग्रेसचे प्रमुख नेते अशोकराव चव्हाण यांच्या उमेदवारीने नांदेड जिल्ह्यातील भोकर हा विधानसभा मतदारसंघ राज्यभरात लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या विरोधात यंदा भाजपने त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीने नामदेव आईलवाड यांना उमेदवारी दिली असली, तरी लोकसभेसारखी क्रेझ आता वंचित आघाडीकडे राहिलेली नाही. त्यामुळे चव्हाण व गोरठेकर यांच्यात थेट लढत होईल. 

भोकर मतदारसंघातून अशोकरावांचे वडील (कै.) शंकरराव चव्हाण यांनी, तसेच गोरठेकरांचे वडीव (कै.) बाबासाहेब गोरठेकर यांनीही प्रतिनिधित्व केले आहे. हे दोघेही 1978 च्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे होते. आता तब्बल 40 वर्षांनी त्यांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Image may contain: 1 person, close-up
(कै.) शंकरराव चव्हाण

लोकसभा निवडणुकीत दुसरे पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रतापराव चिखलीकरांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने आता अशोकराव चांगलेच सावध झाले आहेत. सातत्याने मतदारसंघात राहून ते उर्ध्व पैनगंगा, इतर स्थानिक प्रश्न व सत्ताधाऱ्यांच्या नांदेडविरोधी भुमिकेवर आपल्या प्रचाराचा रोख ठेवला. तर गोरठेकर यांच्यामागे खासदार वगळता भाजप व शिवसेनेची फारशी साथ दिसत नाही. 

Image may contain: 1 person, hat and close-up
(कै.) बाबासाहेब गोरठेकर

अनेक इच्छुकांना डावलून त्यांनी उमेदवारी मिळविल्याने भाजपचे किन्हाळकर, राम चौधरी आदी जुनी मंडळी नाराज आहे. वंचित आघाडीने राज्यभरात अगदी छोट्या छोट्या समाजातील लोकांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणचे उमेदवार हे गोल्ला गोल्लेवार या बहुजन समाजातील आहेत. त्यांची उपस्थिती या प्रमुख उमेदवारांच्या हजेरीने झाकोळली गेली आहे. 

Image may contain: 1 person
माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर

अशोक चव्हाण लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने पुरते घायाळ झाले होते. खरे पाहता लोकसभा निवडणूक लढविण्यापेक्षा विधानसभा लढवायची, असा चंग अशोकरावांनी बांधला होता. मात्र प्रदेशाध्यक्षपद व राज्य पातळीवरील नेता अशी जबाबदारी असताना प्रत्यक्ष नेताच रणांगण सोडणार, असा संदेश जाणार असल्याने व पक्षश्रेष्ठींसाठीही एकएक जागा महत्वाची असल्याने त्यांनी लोकसभा लढविण्याचा निर्णय घेतला. 

मात्र विरोधकांनी, म्हणजे भाजपने केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर उमेदवारी निवडताना हुशारी करून अशोकरावांना खऱ्या अर्थाने लढत देणारा उमेदवार म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी देऊन निवडूनही आणले. मात्र लोकसभेनंतर भाजप व शिवसेना तसेच भाजपच्या अंतर्गतही उमेदवारी वाटपावरून सुंदोपसुंदी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बापूसाहेब गोरठेकर यांना चिखलीकरांनी भाजपमध्ये आणले व अशोकरावांच्या विरोधात उभे केले. 

मात्र त्यांच्या या खेळीने भाजपमधीलच इच्छुक नाराज झाले. हे इच्छुक मतदानाच्या अखेरपर्यंत गोरठेकरांच्या व्यासपीठावर आले नाहीत. चिखलीकरांना एकट्यालाच गोरठेकरांची आघाडी सांभाळावी लागली. त्या तुलनेत अशोक चव्हाण यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळाली. ते स्वतः वाडी, वस्त्या व तांड्यापर्यंत जाऊन पोहोचले. अनेकांची नाराजी दूर केली. गोरठेकरांना मानणारा मतदारही केवळ भोकर तालुक्‍यात आहे. मात्र या मतदारसंघाचा भाग असलेल्या मुदखेड व अर्धापूर तालुक्‍यात चव्हाणांचा एकतर्फी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे अशोक चव्हाणांना यावेळी विजय निश्‍चित मानला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Ashok Chavan really win?