esakal | मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची तपासणी; सांगली महापालिकेच्या सीसीसी केंद्रात 38 रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Inspection of those coming from Mumbai, Pune; 38 patients in Sangli Municipal Corporation's CCC center

सांगली महापालिका क्षेत्रात बाहेरून विशेषत: मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूचना दिल्या आहेत.

मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची तपासणी; सांगली महापालिकेच्या सीसीसी केंद्रात 38 रुग्ण

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रात बाहेरून विशेषत: मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सूचना दिल्या आहेत. बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कुणाला कोविडची लक्षणे दिसून आल्यास त्याला तत्काळ महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये (सीसीसी) दाखल केले जाणार आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मिरज पॉलिटेक्‍निक येथे सुरू केलेल्या सीसीसी केंद्रात आजअखेर 38 रुग्ण दाखल झाले आहेत. शिवाय दोन रुग्णालये कोरोना हॉस्पिटल म्हणून सुरू करण्याचा निर्णय आयुक्त कापडणीस यांनी घेतला आहे. 


आयुक्त म्हणाले, ""महापालिका क्षेत्रात गतवेळी आलेल्या कोरोना लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या आता गतीने वाढत आहे. या रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. ज्यांना विलगीकरणाची आवश्‍यकता आहे, त्यांच्यासाठी मिरज पॉलिटेक्‍निक येथे शंभर बेडचे सीसीसी केंद्र सुरू केले आहे. याबरोबरच सांगलीतील दुधनकर आणि वाळवेकर ही दोन हॉस्पिटल कोरोना हॉस्पिटल म्हणून सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आता सात खासगी रुग्णालये कोरोना रुग्णालय म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.'' 


ते म्हणाले, ""कोरोनाची दुसरी लाट पाहता महापालिकेच्या सीसीसी केंद्राकडे वैद्यकीय स्टाफ कमी पडू शकतो. त्यामुळे 40 एएनएम आणि सहायक नियुक्त करण्यात येणार आहेत. कोविड रुग्णांना कोविड सेंटरपर्यंत नेण्यासाठी महापालिकेने रुग्णवाहिका स्टेशन सुरू केले आहे. त्यामुळे ज्याला रुग्णवाहिका लागणार आहेत, त्याला उपलब्ध करून दिली जाईल. पुढील रुग्णसंख्या लक्षात घेऊन परिस्थिती पाहून आणखी सीसीसी केंद्र सुरू करण्याबाबत महापालिकेने तयारी केली आहे. तसेच आणखी खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगीसुद्धा देण्याची आमची तयारी आहे.'' 

लॉकडाउनची अंमलबजावणी कडक 
आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, ""शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. आठवडी बाजार तसेच रस्त्यावरील बाजार बंद करण्यात आले आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सहायक आयुक्त यांची चार पथके, एक रॅपिड फोर्स तैनात आहे. विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे; अन्यथा कडक कारवाई महापालिकेकडून करण्यात येईल.'' 

संपादन : युवराज यादव 

loading image