माझ्या पप्पांना वाचवा हो....

रुपेश कदम
बुधवार, 26 जून 2019

आपल्यावर जीवापाड प्रेम करणार्या वडीलांची अवस्था पाहून मयुरीच्या तोंडून एकच हाक बाहेर पडतेय...'माझ्या पप्पांना वाचवा हो'. 

दहिवडी  : सगळं कसं छान चाललं होतं. लाडक्या लेकीनं इयत्ता दहावीत 98% गुण मिळविल्याने सगळ्यांच्या आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला कुणाची तरी दृष्ट लागली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. एका सत्कार समारंभानंतर परत येताना दुचाकीच्या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती यांच्या डोक्याला मार लागल्याने ते बेशुध्दावस्थेत गेले. आपल्यावर जीवापाड प्रेम करणार्या वडीलांची अवस्था पाहून मयुरीच्या तोंडून एकच हाक बाहेर पडतेय...'माझ्या पप्पांना वाचवा हो'. 

बिदाल (ता. माण) येथील श्रीपती कृष्णा बोराटे हे गावातीलच नव महाराष्ट विद्या मंदिर या शाळेत अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम करतात. त्यांना मयुरी ही मुलगी आहे. आपल्या हुशार लेकीसाठी ते फलटण येथे राहत होते. मयुरीला त्यांनी मुधोजी हायस्कूल फलटण या शाळेत घातले होते. मयुरीनेही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत इयत्ता 10 वीत 98.80% गुण मिळवले. संपुर्ण फलटण केंद्रात मयुरी प्रथम आली. आपल्या कुटुंबियांसोबतच संपुर्ण बिदाल गावाचे नाव उंचावल्या बद्दल सर्वांनाच तिचा अभिमान वाटला.

मयुरीने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. पण अशाच एका सत्कारावेळी काळजाचा ठाव घेणारी दुर्दैवी घटना घडली. 20 जून 2019 रोजी नायगाव (ता.खंडाळा) येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते मयुरीचा सत्कार करण्यात आला. सत्कार झाल्यानंतर मयुरी व तिचे वडील दुचाकीवरुन फलटणला परत घरी येत होते. घरी परतण्याचा प्रवास संपत आला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. फलटण जवळील वडजल या गावाजवळ बाप लेक आले असता दुचाकीला अपघात झाला. या अपघातात मयुरीचा हात मोडला तर वडील श्रीपती बोराटे यांच्या डोक्यास जबर मार लागला व ते बेशुध्दावस्थेत गेले.

तत्काळ दोघांना लाईफ लाईन हाॅस्पिटल फलटण येथे हलविण्यात आले. मयुरीवर तिथे उपचार करण्यात आले. परंतू श्रीपती बोराटे यांची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सहयाद्री हाॅस्पिटल डेक्कन पुणे येथे हलविण्यात आले. डाॅक्टर उपचार करत आहेत पण आजअखेर ते बेशुध्दावस्थेतून बाहेर आलेले नाहीत. ICU - A, BED No - 310 वर त्यांच्यावर बेशुद्धावस्थेत उपचार सुरु आहेत. श्रीपती बोराटे यांच्या उपचारासाठी आजपर्यंत साडे चार लाख रुपये खर्च आला आहे. काही रक्कम त्यांच्या नातेवाईकांनी भरली आहे पण अतिशय बिकट व हालाखीची परिस्थिती असल्याने हा खर्च बोराटे कुटुंबियांच्या अवाक्या बाहेरचा आहे. तसेच अजून किती दिवस उपचार करावे लागतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी 'श्रीपती कृष्णा बोराटे, सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था शाखा बिदाल, खाते नं. 32359172317, IFSC code No. SBIN 0007782 या खात्यावर रक्कम जमा करावी.

मयुरीच्या हाकेला साद.....
मयुरीच्या आर्त हाकेला साद देत प्रसिद्ध उद्योजक व श्री अॅग्रो ग्रुपचे संस्थापक सागर घोरपडे यांनी पन्नास हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच बिदाल व इतर गावच्या ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे दोन दिवसात अठ्ठावन हजार रुपये जमा केले. ही मदत जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे यांच्या हस्ते मयुरी बोराटे हिचेकडे सुपुर्त करण्यात आली. ही रक्कम स्विकारताना मयुरीस अश्रू अनावर झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मयुरीच्या शिक्षणावर परिणाम झाला असून पुणे येथे शिकण्याची तयारी केलेली मयुरी नाईलाजास्तव फलटण येथे प्रवेश घ्यावा लागत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save My Father