पालघरमध्ये अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान 

पालघरमध्ये अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान 

पालघर : पालघरमध्ये दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास थंड वाऱ्यासह पाऊस बरसला असून यामुळे शेतकऱ्यांबरोबर नागरिकांची धावपळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांसह मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. 

पालघरमध्ये सोमवारपासूनच ढगाळ वातावरण होते, त्यानंतर अचानक मंगळवारी दुपारी जवळपास अर्धा तास पालघरमधील नांदगावसह किनारपट्टी भागात काही ठिकाणी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह आंब्याचे नुकसान झाले आहे. पालघरमध्ये आंब्याला अजून मोहर आलेला नसतानाच पाऊस पडल्याने आंब्याचा हंगाम आणखी लांबण्याची शक्‍यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. या पावसामुळे गवत पावळी काळी पडत असल्याने त्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. 

अचानक बरसलेल्या या पावसामुळे भाजीपाल्यालाही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. भाजीपाल्यावर कीड, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला असून केळीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन केळीची पाने गुंडाळली जात आहेत. तसेच त्याच पांढऱ्या रंगाची विशिष्ट प्रकारची कीडदेखील आढळून येत आहे. दरम्यान, या सर्वाकडे कृषी विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

या वर्षी पालघर तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक तर गेलेच, पण आता या हंगामात पेरलेली कडधान्य व भाजीपाल्याची लागवड यावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर केळीलाही रोग आल्याने केळी कापून टाकण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाने यावर उपाय सुचवावा. 
- संदेश पाटील, शेतकरी 

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह केळी, नारळ यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. केळीवर किडीचा प्रादुर्भाव आहे, यासाठी शेतकऱ्यांनी बनाना स्किपर प्रोफेक्‍स सुपर 20 मिली अधिक स्टिक पाच मिली यांचे मिश्रण 10 लिटर पाण्यात मिसळून पंपाने फवारणी करावी. 
- सुधीर गावड, कृषी पर्यवेक्षक, पालघर 

 

web title : Loss of agriculture due to unseasonal rains

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com