पालिका अभियंत्याकडून 22 लाखांची खंडणी 

file photo
file photo

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) अधिकारी असल्याचे सांगून महापालिकेच्या सहायक अभियंत्याकडून 23 लाखांची खंडणी घेणाऱ्या तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. एमबीए पदवीधारक असलेल्या या भामट्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका महिलेचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल संतोष शर्मा ऊर्फ ठोमरे (28, रा. चिराबाजार) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महापालिकेच्या एच पूर्व विभागातील एका सहायक अभियंत्याने तक्रार केली होती. हा सहायक अभियंता 2016 मध्ये जी साऊथ विभागात नियुक्तीवर होता. त्या वेळी त्याला दाणी मॅडम असे नाव सांगणाऱ्या एका महिलेचा दूरध्वनी आला. 
तुमच्याविरोधात लाच घेतल्याची तक्रार आली आहे. या प्रकरणी एसीबी कार्यालयात येऊन भेटा, असे तिने सांगितले. त्यानंतर काही वेळाने तिने पुन्हा दूरध्वनी केला. आपल्या कार्यालयात सीसी टीव्ही यंत्रणा असल्यामुळे वरिष्ठांनी बाहेर भेटण्यास सांगितले आहे, असे सांगून तिने या सहायक अभियंत्याला वरळीतील एका हॉटेलात बोलावून घेतले. त्या वेळी तेथे बसलेल्या शर्मा याची ओळख एसीबीचे उपनिरीक्षक ठोमरे अशी तिने करून दिली.

तुमच्याविरोधात लाच मागितल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, असे दोघांनी या सहायक अभियंत्याला सांगितले. पैसे न दिल्यास कारवाई करावी लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. त्यानुसार त्याने या दोघांना साडेसात लाख रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी त्याला वेळोवेळी धमकावून 22 लाख 50 हजारांची रक्कम घेतली. त्यानंतर त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. 
एसीबीने सीएसएमटी परिसरात सापळा रचला. त्या वेळी साडेसहा लाख रुपये घेताना आरोपी शर्मा याला पकडण्यात आले. चौकशीत तो एसीबी अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी खंडणी व तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

तीन बॅंकांकडून कर्ज 
आरोपींनी या सहायक अभियंत्याला वेळोवेळी धमकावून 22 लाख 50 हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यासाठी त्याने तीन बॅंकांकडून कर्ज घेतले. या आरोपींनी पुन्हा 45 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अटक करण्याची भीतीही त्यांनी दाखवली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com