निवडणुकीतील राजकीय दादागिरीला चाप

प्रशांत बारसिंग
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

प्रत्येक महापालिकेसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकारी नियुक्त
मुंबई - महापालिका निवडणुकीत स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव येण्याची बाब नवीन नाही, या दादागिरीला चाप लावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महापालिकेसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि वॉर्डरचनेवर या अधिकाऱ्याचे नियंत्रण असेल, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली.

प्रत्येक महापालिकेसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकारी नियुक्त
मुंबई - महापालिका निवडणुकीत स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव येण्याची बाब नवीन नाही, या दादागिरीला चाप लावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक महापालिकेसाठी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक केली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि वॉर्डरचनेवर या अधिकाऱ्याचे नियंत्रण असेल, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली.

येत्या फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकींसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. सध्या राज्यातील नगरपालिका/नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या खर्चावर पारदर्शकता आणली आहे. आता महापालिका निवडणूकदेखील ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली होतील.

महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकदा स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव येत असतो. या दबावापुढे प्रशासनाला अनेकदा नमते घ्यावे लागते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अनेकदा तक्रारी प्राप्त होतात. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाला मिळालेल्या अधिकारांचा योग्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवाड्यांचा आधार घेण्याचे सूचित करण्यात आले; तसेच स्थानिक प्रशासनाला कारवाई करण्यात अडचण आल्यास संबंधित घटनेचा थेट आयोगाला अहवाल पाठविण्याचे आवाहन निवडणूक आयुक्‍तांनी केले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य निवडणूक आयुक्‍तांनी प्रत्येक महापालिकेसाठी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्‍त आणि अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून अनेकदा जबाबदारी पेलली आहे; तसेच हे अधिकारी अत्यंत कडक शिस्तीचे असल्याची त्यांची ख्याती आहे. सध्या प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्याने नव्याने प्रभाग आणि वॉर्डरचना तयार करण्याची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मात्र हे करत असताना अनेक ठिकाणी राजकीय दबावापोटी वॉर्डरचना करण्यात आल्याच्या तक्रारी आयोगाला मिळाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर हे आयएसएस अधिकारी सुनावणी घेऊन वॉर्ड आणि प्रभागरचना निश्‍चित करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या नवीन यंत्रणेमुळे स्थानिक राजकीय मनमानीला चाप बसणार असल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

अशी असेल जबाबदारी
यूपीएस मदान (एमएमआरडीएचे आयुक्त) - मुंबई
सीताराम कुंटे - पुणे व पिंपरी-चिंचवड
विजय कुमार - ठाणे व नागपूर
ए. एम. लिमये - सोलापूर
महेश पाठक - अकोला व अमरावती
दीपक कपूर - नाशिक व उल्हासनगर

Web Title: elections, political pressure control