राज्यात स्त्रियांमधील एंडोमेट्रिओसिस प्रकरणांमध्ये 40 टक्के वाढ, वैद्यकिय तज्ज्ञांचे मत

राज्यात स्त्रियांमधील एंडोमेट्रिओसिस प्रकरणांमध्ये 40 टक्के वाढ, वैद्यकिय तज्ज्ञांचे मत

मुंबई: महाराष्ट्रात एंडोमेट्रिओसिस म्हणजेच मासिक पाळीतील विकार होण्यामध्ये वाढ झाली असून जवळपास 40% टक्के एवढे हे प्रमाण आहे. जनजागृती अभावी दुर्दैवाने बर्‍याच महिलांना या रोगाचे निदान उशीराने होते. परिणामी अनावश्यक त्रास आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे, रोगाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान होणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. 

एंडोमेट्रीअम म्हणजे काय? 

एंडोमेट्रीअम हे गर्भाशयाच्या आत असलेले आवरण आहे. जे मासिक पाळीतील रक्तस्रावात गळून पडते. हे आवरण जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतं, तेव्हा त्याला एंडोमेट्रिऑसिस असं म्हणतात. यामुळे, मासिक पाळी दरम्यान भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो. 

14 ते 49 वयोगटात आजाराचे प्रमाण अधिक

गर्भाशयाच्या बाहेर एंडोमेट्रियल टिश्‍यू आल्यामुळे होणारी स्थिती आणि यामुळे खासकरून मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये वेदना होतात. 15 ते 49 या प्रजननक्षम वयोगटामध्ये या रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे तसेच काही पर्यावरणीय घटक या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त स्त्रियांना बर्‍याचदा वेदनादायक संभोग, मासिक पाळी असह्य वेदना, चॉकलेट सिस्टची तक्रार सतावते. या आजाराचे निदान करण्यासाठी लेप्रोस्कोपी उपयुक्त ठरू शकते. 

पाळी येते तेव्हा रक्त आणि गर्भपिशवीतल्या आतलं आवरण जसं योनीमार्गातून बाहेर येतं तसं काही स्त्रियांमध्ये स्राव जास्त असल्यास गर्भनलिकेतून पोटात रक्त पडतं. असं हे रक्त आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी या पोटाच्या आतल्या अवयवांवर जाऊन चिकटतात. मुख्यत्वे करून अशा बीजांडामध्ये रक्ताच्या सिस्ट होतात. ज्याला चॉकलेट सिस्ट असंही म्हटलं जातं. वेळीच उपचार न केल्यास किंवा निदान न झाल्यास चॉकलेट सिस्ट गंभीर परिणाम करू शकते  किंवा ते फुटणे, वंध्यत्व, गर्भाशयाची सूज आणि तीव्र वेदना अशी गंभीर गुंतागुंत निर्माण करु शकते. चॉकलेट सिस्ट (अंडाशयाभोवती आढळणार्‍या गर्भाशयाच्या अस्तराच्या गाठी) आणि गर्भाशयाचा अ‍ॅडिनोमायोसिस निदान सोनोग्राफी आणि कलर डॉपलरच्या माध्यमातून होऊ शकते. एण्डोमेट्रिऑसिसच्या अन्य सर्व जखमांचे निदान एमआरआयच्या माध्यमातून होते असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. करिश्मा डाफळे यांनी सांगितले. 

हे उपचार परिणामकारक

एण्डोमेट्रिऑसिसचे निदान आणि त्यावर उपचार करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे लेप्रोस्कोपी. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त असलेल्या स्त्रिया नैसर्गिकरित्या तसेच काही पुनरुत्पादक सहाय्याने गर्भधारणा करू शकतात. एण्डोमेट्रिऑसिसचे निदान झालेल्या स्त्रियांनी वर्षातून एकदा अल्ट्रासाऊंड तपासणी करून घ्यावी. अंडाशयाभोवतीच्या गाठी यामुळे लक्षात येतात. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी रक्ताची तपासणी केल्यास ओव्हरियन रिझर्व्ह (अंडाशयाभोवतीचे घटक) किती आहे हे समजते. एण्डोमेट्रिऑसिसचा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये ओव्हरियन रिझर्व्हचे प्रमाण घटलेले असते. गर्भाशयाच्या अस्तराच्या मोठ्या गाठी आढळल्यास त्या स्त्रियांवर शस्त्रक्रियात्मक उपचार सुरू केले पाहिजेत असा ही सल्ला डॉ. डाफळे यांनी दिला आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Maharashtra Womens Suffering of endometriosis increased 40 Percent

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com