मालेगाव बॉम्बस्फोट  : "इन-कॅमेरा' सुनावणीचा  एनआयएकडून पुनरुच्चार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला आमचा पाठिंबाच आहे; मात्र या खटल्याची संवेदनशीलता पाहता सुनावणी "इन-कॅमेरा' घ्यायला हवी, असे एनआयएने न्यायालयात सांगितले.

मुंबई : मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी इन-कॅमेरा (बंद खोलीत) करण्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयात समर्थन केले आहे. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला आमचा पाठिंबाच आहे; मात्र या खटल्याची संवेदनशीलता पाहता सुनावणी "इन-कॅमेरा' घ्यायला हवी, असे एनआयएने न्यायालयात सांगितले.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी "इन-कॅमेरा' घेण्याची मागणी एनआयएने केली आहे. या मागणीला आरोपींनीही पाठिंबा दर्शवला असला, तरी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विरोध केला आहे. त्यांनी ऍड्‌. रिजवान मर्चंट यांच्यामार्फत केलेल्या अर्जावर न्यायालयाने लेखी बाजू मांडण्याचे निर्देश एनआयएला दिले होते.

मालेगाव खटला संवेदनशील असल्याची जाणीव माध्यमांनाही आहे. विशिष्ट समुदायाच्या विरोधात आणि जिहादी कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी खटल्याची सुनावणी "इन-कॅमेरा' घेण्याची मागणी केली आहे, असे एनआयएने म्हटले आहे.

एनआयएचे माध्यमांचे स्वातंत्र्य आणि अधिकारांना पूर्ण समर्थन आहे; तसेच माहिती अधिकारालाही पाठिंबा आहे; परंतु मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची संवेदनशीलता ध्यानात घेऊन सुनावणी "इन-कॅमेरा' असावी, असे एनआयएचे म्हणणे आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon bombing: "In-camera 'hearing." Revision from the NIA