माथेरान राणीची वाट बिकटच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

माथेरान - ८ मे पासून बंद असलेल्या येथील मिनी ट्रेनच्या सुरक्षिततेच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. चाचणीदरम्यान ही गाडी फक्त साडेनऊ किलोमीटर अंतरापर्यंत नेण्यात येते. जुम्मापट्टी स्टेशन आणि वॉटर पाईपच्या दरम्यान ९५ हा रेल्वे पॉईंट आहे. त्यापुढे रेल्वे मार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आजही हा मार्ग दरडींखाली  दबलेला आहे.

माथेरान - ८ मे पासून बंद असलेल्या येथील मिनी ट्रेनच्या सुरक्षिततेच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. चाचणीदरम्यान ही गाडी फक्त साडेनऊ किलोमीटर अंतरापर्यंत नेण्यात येते. जुम्मापट्टी स्टेशन आणि वॉटर पाईपच्या दरम्यान ९५ हा रेल्वे पॉईंट आहे. त्यापुढे रेल्वे मार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. आजही हा मार्ग दरडींखाली  दबलेला आहे.

अनेक ठिकाणी रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठे दगड रुळावर आले आहेत. अनेक ठिकाणी रुळाखालील माती वाहून गेली आहे. दुरुस्तीकामांचा केवळ देखावा  सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसे पाहता २६ जुलै २००५ च्या तुलनेत हे नुकसान अगदी नगण्य आहे. त्या वेळी इच्छाशक्तीच्या जोरावर नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाची नव्याने उभारणी करण्यात आली आणि शतकमहोत्सवी वर्षात मिनी ट्रेन पुन्हा जुन्या वैभवाने धावू लागली. आतापर्यंत अनेक वेळा नैसर्गिक अडथळे पार करत मिनी ट्रेनने लाखो पर्यटकांना निखळ आनंद दिला. सध्या ही ट्रेन अनास्थेच्या विळख्यात सापडली आहे. रेल्वेच्या मुख्य महाव्यवस्थापकांची इच्छाशक्ती आहे म्हणून किमान काही प्रमाणात आशादायक चित्र दिसते आहे. रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक नेरळ रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्या वेळी माथेरानच्या राणीची या अनास्थेच्या विळख्यातून मुक्तता करण्याची विनंती त्यांना केली जाणार आहे. 
८ मे रोजी अमन लॉज स्थानकापुढे काही अंतरावर सकाळी साडेसात वाजता माथेरान मिनी ट्रेनचा डबा रुळावरून घसरला आणि  सुरक्षिततेच्या कारणावरून नेरळ-माथेरान सेवा बेमुदत बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. या निर्णयामुळे केवळ मिनी ट्रेनच बंद झाली असे नाही; तर माथेरानच्या पर्यटनाचा श्वासही कोंडला आहे. १९०७ पासून ८ मे २०१६ पर्यंत लाखो आबालवृद्ध पर्यटकांना निखळ आनंद देणाऱ्या आणि माथेरानकरांसाठी जीवनवाहिनी असलेल्या माथेरानच्या राणीला जमाखर्चाच्या हिशेबात तोलणे गैर ठरेल, अशी स्थानिकांसह पर्यटकांची भावना आहे. विविध स्तरांवर झालेल्या पाठपुराव्यानंतर मिनी ट्रेन पूर्ववत व्हावी यासाठी सात कोटी निधीची तरतूद केल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. तब्बल १६७ वर्षांची पर्यटनाची परंपरा जपणाऱ्या माथेरानच्या अस्तित्वापुढेच यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. माथेरानची अर्थव्यवस्थाच या गाडीमुळे रुळावर राहिली आहे.  जागतिक वारसा म्हणून माथेरान मिनी ट्रेनची नोंद व्हावी, असा कधी काळी रेल्वेचा प्रयत्न होता; मात्र अलीकडे या प्रयत्नांची जागा अनास्थेने घेतली आहे. अजूनही निम्म्याहून अधिक मार्गाची दुर्दशा कायम आहे. 

स्थानिक नेते श्रेयवादात 
एकीकडे माथेरानसारखे सर्वांगसुंदर पर्यटनस्थळ सर्व बाजूंनी अडचणीत आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच वेळी मिनी ट्रेन सुरू होणार असा थोडा आभास निर्माण होताच अमुक नेत्याच्या प्रयत्नामुळे मिनी ट्रेन सुरू होणार, अशा वल्गना करत स्थानिक नेते श्रेयवादात अडकून पडले आहेत.

Web Title: Matheran Queen