मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांची हुडांकडून झाडाझाडती

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आदी पक्षांशी आघाडी करण्यासाठी योग्य वेळेत का पावले उचलली नाहीत, अशा शब्दांत निरीक्षक म्हणून आलेल्या भूपिंदरसिंग हुडा यांनी मुंबई कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि नेत्यांना खडसावल्याचे समजते. त्यांनी आज मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधत कामत आणि निरुपम गटातील वाद निवळण्यासाठी शिष्टाई केली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर कॉंग्रेसमधील निरुपम आणि कामत गटातील वाद उफाळून आला आहे. हा वाद मिटविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने हुडा यांना राज्यात पाठवले होते. हुडा यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदुरकर आदींची वैयक्‍तिक भेट घेऊन मुंबईत कॉंग्रेस पक्षाने इतर समविचारी पक्षांसोबत आघाडी विषयी चर्चा का केली नाही, याबाबत विचारणा केली. याबाबतचा अहवाल ते पक्षश्रेष्ठींना देणार आहेत.

तसेच कामत आणि निरुपम यांच्यातील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी शिष्टाई केली. या बैठकीला कामत उपस्थित नव्हते. कॉंग्रेस विरोधातील कामत यांच्या जाहीर वक्‍तव्यांनी पक्षाचे नुकसान झाले आहे. हे कामत यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला शोभण्यासारखे नाही, अशी भावना या बैठकीत व्यक्‍त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे कामत यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हुडा यांनी माध्यमांशी बोलताना कॉंग्रेस एकदिलाने महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: mumbai congress leader Bhupinder-Singh-Hooda