स्थानिक निवडणुकीत भाऊगर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

11 हजार उमेदवार निवडणूक रिंगणात
मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत उमेदवारांची अक्षरशः भाऊगर्दी झाली आहे. येत्या 27 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या 3,705 जागांसाठी जवळपास 11 हजार उमेदवारांनी अर्ज भरल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर नगराध्यक्षपदासाठी 450 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी सुरवातीला उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्यास सांगितले होते. उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाउनलोड करायचे आणि सही करून अर्जाची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायची, अशी सूचना केली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि राजकीय पक्षांच्या मागणीनंतर आयोगाने ऑफलाइन अर्ज भरण्यासही मान्यता दिली.

ज्या उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत, अशांची माहिती संकलित करण्याचे काम स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे एकूण किती उमेदवारांनी अर्ज भरले, छाननीत किती अर्ज बाद होतील आणि माघारीच्या मुदतीत किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतील, याची माहिती उपलब्ध झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

तथापि, आयोगाकडे उपलब्ध असलेल्या प्राथमिक अंदाजानुसार 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी एकूण 11 हजार उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी साडेचारशे उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र, हा आकडा पुढे वाढण्याची शक्‍यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

निवडणुकीचा पहिला टप्पा
- नगरपालिका - 147
- नगरपंचायती - 18
- एकूण जागा - 3 हजार 705
- एकूण प्राप्त अर्ज - अंदाजे 11 हजार

Web Title: municipal & panchyat committee election