मुख्यमंत्र्यांचे एका दगडात दोन पक्षी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव महिनाभरासाठी निलंबित
मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात बहुमताने मंजूर करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्यासाठी निलंबित केल्याचे आज मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. या निर्णयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे एका दगडात दोन पक्षी मारल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आता किमान एक महिना तरी मुंढे हे नवी मुंबईच्या पालिका आयुक्तपदी कायम असतील.

आयुक्त मुंढे आणि नगरसेवक यांच्यातील मतभेद शिगेला पोचल्यानंतर एक आठवड्यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी आयुक्तांविरुद्धचा अविश्वासाचा प्रस्ताव 105 विरुद्ध सहा मतांनी मंजूर झाला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आयुक्तांविरोधात भूमिका घेतली. भाजपचे सदस्य मात्र आयुक्तांबरोबर राहिले. त्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. यानंतर महापौरांकडून या ठरावाची प्रत नगरविकास मंत्री, पर्यायाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आली होती. त्यासोबत एक विनंतीपत्र पाठवून विश्वास गमावलेल्या आयुक्तांची ताबडतोब बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

पालिका आयुक्तांविरुद्ध कारवाई झाली नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबईत थेट "मातोश्री' गाठले. तेथे त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. गरज भासल्यास आपण याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले. ठाकरे यांच्या भेटीनंतर संबंधित शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठले. तेथे मुख्यमंत्र्यांनी त्यांना या विषयावर मध्यममार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. नगरविकास मंत्रालयाने नवी मुंबई महापालिकेकडून पाठविण्यात आलेला अविश्वासाचा प्रस्ताव एक महिन्यासाठी निलंबित करताना त्यावर 30 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण द्यावे, असे कळवले आहे.

महापालिकेकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर नगरविकास खाते सांभाळणारे मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: politics by devendra fadnavis